केरळ बाँबस्फोटात ३ जणांचा मृत्यू, तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक !
एर्नाकुलम् (केरळ) – येथे ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत झालेल्या ३ बाँबस्फोटांत ठार झालेल्यांची संख्या ३ झाली आहे. यामध्ये १२ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. ४१ घायाळांपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. १२ जण अतीदक्षता विभागात आहेत, तर ३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक या घटनेची चौकशी करेल. या पथकात २० सदस्य असतील.
यहोवाच्या ‘साक्षीदार’ गटाची विचारसरणी देशविरोधी असल्याने केले बाँबस्फोट ! – शरण आलेल्या डॉमनिक मार्टिन याचा दावा
बाँबस्फोटानंतर काही घंट्यानंतर केरळच्या कोडकरा पोलीस ठाण्यात डॉमनिक मार्टिन याने शरणागती पत्करत बाँबस्फोट त्यानेच केल्याचे स्वीकृती दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. बाँबस्फोटापूर्वी मार्टिन याने ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमांतून विचार व्यक्त केले होते. यात त्याने म्हटले होते की, तो ख्रिस्ती धर्माच्या यहोवाच्या ‘साक्षीदार’ गटाशी संबंधित आहे; परंतु त्याला त्यांची विचारसरणी आवडत नाही. मार्टिन त्यांना देशासाठी धोका मानतो; कारण ते देशातील तरुणांच्या मनात विष कालवत आहेत. त्यामुळे मार्टिन याने ‘साक्षीदार’ गटाच्या प्रार्थनासभेत बाँबस्फोट केला.
केरळ पोलिसांनी प्रार्थनासभेत बाँब मार्टिन यानेच ठेवल्याला दुजोरा दिला आहे. पोलिसांना त्याच्या भ्रमणभाषमधून बाँबस्फोट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रिमोट कंट्रोलचे पुरावे सापडले आहेत.
डॉमनिक मार्टिन काही वर्षे दुबईत राहिला होता !
डॉमनिक मार्टिन हा गेली १५ वर्षे दुबईमध्ये राहिला. तेथे तो ‘इलेक्ट्रिशन’ म्हणून काम करत होता. त्याला ‘इलेक्ट्रिक सर्किट’ बनवण्याचे पूर्ण ज्ञान होते. २ मासांपूर्वीच तो भारतात परतला होता. देशात परतल्यानंतर तो लहान मुलांची शिकवणी घेण्याचे काम करत होता. दुबईमध्ये असतांना तो कुणाकुणाच्या संपर्कात होता ?, याचा शोध अन्वेषण यंत्रणा घेत आहेत.