(म्हणे) ‘इस्रायल निष्पाप लोकांवर सूड उगवत आहे !’ – सोनिया गांधी

  • सोनिया गांधी यांनी लिहिला इस्रायल-हमास युद्धावर लेख !

  • हमासच्या आक्रमणाला संबोधले ‘अमानुष’ !

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी

नवी देहली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर लेख लिहिला आहे. ‘द हिंदु’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या या लेखामध्ये त्यांनी हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या आक्रमणाला ‘अमानुष’ म्हटले आहे. ‘या आक्रमणात एक सहस्राहून अधिक लोक ठार झाले. हे आक्रमण इस्रायलसाठी विनाशकारी होते’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याखेरीज त्यांनी गाझावर इस्रायलकडून होणार्‍या आक्रमणाविषयीही प्रश्‍न उपस्थित करत ‘निष्पाप लोकांवर सूड उगवण्यात येत आहे’, अशी टीका केली आहे.

सोनिया गांधी यांनी लेखात म्हटले की, इस्रायल आता पूर्ण शक्तीनिशी आणि मोठ्या प्रमाणात असाहाय, तसेच निष्पाप लोकांविरुद्ध सूड उगवत आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली शस्त्रे ही मुले, महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध वापरली जात आहेत. ज्यांचा हमासच्या आक्रमणाशी काहीही संबंध नव्हता, ते मारले गेले आहेत. नागरिकांना रुग्णालये अपूर्ण पडत आहेत. पाणी, अन्न आणि वीज नाकारणे हे पॅलेस्टिनी लोकांसाठी सामूहिक शिक्षेपेक्षा अल्प नाही. इस्रायल सरकार हमासच्या कृतींची पॅलेस्टिनी लोकांच्या कृतींशी तुलना करून मोठी चूक करत आहे. हमासचा नाश करण्याच्या निर्धाराने इस्रायलने गाझामधील सामान्य लोकांचा विनाश केला आहे.

संपादकीय भूमिका

  • वर्ष १९८९ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये सहस्रो निष्पाप हिंदूंच्या हत्या केल्या आणि साडेचार लाख निष्पाप हिंदूंचे विस्थापन केले, तसेच आजही जिहादी आतंकवाद्यांकडून भारतात बाँबस्फोट, दंगली, हत्या आदींद्वारे निष्पाप हिंदूंच्या केल्या जात आहेत. या सर्वांविषयी सोनिया गांधी यांना कधी ‘जिहादी आतंकवादी निष्पाप हिंदूंचा सूड उगवत आहेत’, असा लेख लिहावासा वाटला का ?
  • इस्रायल निष्पाप लोकांवर नाही, तर हमासच्या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करत आहे ! या कारवाईत सुक्यासमवेत ओलेही जळत आहे; कारण हमासने स्वरक्षणार्थ ढाल बनवलेले लोक मारले जात आहेत. याविषयी सोनिया गांधी यांनी हमासला प्रश्‍न विचारला पाहिजे !