राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभातील त्रुटींविषयी तपासणी पथक आढावा घेणार !
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे २६ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फातोर्डा येथील मैदानात उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक प्रेक्षकांना विशेषत: मैदानाच्या पूर्व दिशेला असलेल्या कक्षात ‘कार्यक्रमात वक्ते काय बोलत आहेत?’, हे व्यवस्थित ऐकू येत नव्हते. मैदानातील प्रेक्षक दालनामध्ये पत्रकारांसाठी एक कक्ष स्थापन करण्यात आला होता. पत्रकारांनाही ‘वक्ते काय बोलत आहेत ?’ हे समजत नव्हते. यामुळे उपस्थित पत्रकारांची गैरसोय झाली. यामुळे काही पत्रकारांवर कार्यक्रमाचे भ्रमणभाषवर थेट प्रक्षेपण ऐकून वृत्तसंकलन करण्याची वेळ आली. समारंभातील या त्रुटींविषयी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी एक तपासणी पथक स्थापन केले आहे. हे पथक या त्रुटींचा अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल सरकारला सुपुर्द करणार आहे.