खोटा परवाना दिल्याच्या प्रकरणी भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित !
यापूर्वीही एका प्रकरणात सुतार यांना करण्यात आले होते निलंबित !
कणकवली – लाकडाची वाहतूक करण्यासाठी खोटा परवाना (पास) दिला, तसेच या परवान्यावर संबंधित वाहनाचे छायाचित्र लावण्याऐवजी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे छायाचित्र लावले. या प्रकरणी भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केली. याविषयी सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यांसह तक्रार केली होती.
भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांच्याविषयी लाकडाची वाहतूक करण्यासाठी बोगस परवाना देणे, तसेच अन्य तक्रारी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. याविषयी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन तक्रार नोंद केली होती. सत्यवान सुतार यांनी दिलेला परवाना वाहनाच्या क्षमतेपेक्षा तिप्पट क्षमतेच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठीचा होता, हे ताम्हणकर यांनी उघड केले. सत्यवान सुतार हे यापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असतांना अवैधरित्या वृक्षतोडीच्या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधीत सुतार हे दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल कार्यालयात कार्यरत असणार आहेत.
संपादकीय भूमिकापहिल्या प्रकरणात केवळ निलंबित करण्याऐवजी दोषीवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा तसाच गुन्हा करण्याचे धाडस झाले नसते ! |