प्रसारमाध्यमे दहशत पसरवून सातत्याने नकारात्मक बातम्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण करतात !
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रसारमाध्यमांच्या सध्याच्या स्थितीवर व्यक्त केलेले परखड प्रतिपादन
आचार्य अत्रे यांनी ५० वर्षांपूर्वी ‘भविष्यात काय घडणार आहे, हे सांगितले आहे’, असे मला वाटते. आचार्य अत्रे म्हणायचे, ‘‘सायंकाळी पेपर वाचला की, मुंबईत काही आपण जिवंत राहू शकत नाही, असे वाटते. त्यामुळे रात्री बॅग भरायला घेतली, तर सकाळी पेपर वाचल्यावर कळते की, पुण्यातही तीच स्थिती आहे. अशा प्रकारे प्रसारमाध्यमे दहशत पसरवतात. सगळे कसे बुडणार आहे, हेच सातत्याने दाखवले जाते. सातत्याने नकारात्मक बातम्या देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जाते.’’ त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात माध्यमांना मोठी झळ बसली. कोरोनाने घाव घातला आणि माध्यमे सपाट झाली. माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, तेच मला पटत नाही. याविषयी राज्यघटनेत हे कुठे लिहिले आहे ? ते दाखवा.
काळ्या पैशाविना मिडिया चालेल का ?
पत्रकारिता जशी भांडवलदारांची गुलाम होत गेली, तसा पत्रकारितेचा अस्त होत गेला. एका लेखणीवर पत्रकार उभे राहिले, स्वतःचा पेपर काढला आणि तो चालवला. काळ्या पैशाविना ‘मिडिया हाऊस’ चालूच होऊ शकत नाही. सगळे नामवंत पत्रकार आणि मिडिया हाऊस कोणत्या तरी विदेशी किंवा काळ्या निधीवर माध्यमे चालवतात अन् आविष्कार दाखवतात.
सध्याची बोजड भाषेतील एकतर्फी पत्रकारिता !
आजच्या पत्रकारांना मी पत्रकार मानत नाही. किती वृत्तपत्रांचे मालक संपादक आहेत ? आचार्य अत्रे, ना.भी. परुळेकर, अनंत भालेराव हे मालक संपादक होते. आज कुणीतरी ‘मॅकडोनाल्ड’ चालवून पैसे मिळवतो आणि मिडिया हाऊस चालवतो. जगात पहिल्यांदा संपादकीय मागे घेतले, त्यांना बुद्धीमान म्हणतात. जितके अधिक बोजड करता येईल, तेवढे लिखाण करतात. आपण लिहिलेले समोरच्याला समजले पाहिजे, ही आपले दायित्व आहे. आता सगळे एकतर्फी झाले आहे. समोरच्याला समजते आहे कि नाही ? हे पाहिले जात नाही.