झोपेचे सोंग कशाला ?
काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील जाहीर सार्वजनिक सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘कृषीमंत्री असतांना महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकर्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते; परंतु त्यांनी शेतकर्यांसाठी काय केले ?’’ मुख्य म्हणजे मोदी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही टीका केली. मोदी यांनी केलेली टीका ही योग्य आणि वस्तूस्थितीला धरून अशीच आहे. याला प्रत्युत्तर देतांना शरद पवार म्हणाले, ‘‘मोदी यांनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर नेणारी आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ६२ सहस्र कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. वर्ष २०१२-१३ मध्ये दुष्काळ पडला होता, तेव्हा चारा छावण्या उभ्या केल्या.’’ असे उत्तर देऊन त्यांनी ते स्वतः कृषीमंत्री असतांना केलेल्या कार्याची माहिती दिली.
काँग्रेसची सत्ता असतांनाही शेतकर्यांची वाताहत ?
छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते. महाराजांच्या काळात शेतकर्यांनी आत्महत्या केल्या नाहीत, उलट शेतकरी सधन आणि आनंदी होते. दुसरीकडे शरद पवार यांची राजकारणात ६३ वर्षे गेली आहेत. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते; मात्र या तथाकथित राजाने स्वत:च्या प्रजेसाठी, म्हणजे शेतकर्यांच्या हितासाठी म्हणावे तितके कार्य केलेले नाही. देशात काँग्रेसची सत्ता ६० वर्षे होती. या सत्ताकाळात शरद पवार हे ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असे असतांनाही शेतकर्यांची प्रगती का झाली नाही ? अजूनही शेतकरी आत्महत्या का करतात ? शासनाने शेतकर्यांसाठी अनेक योजना करूनही त्या त्यांच्यापर्यंत का पोचल्या नाहीत ? शरद पवार यांनी चालू केलेल्या चारा छावण्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. त्याची चौकशीही महाराष्ट्र सरकारने चालू केली होती, तसेच ६२ सहस्र कोटी रुपयांची कर्जमाफी करूनही शेतकरी अजूनही कर्जाच्या संकटात का आहे ? काँग्रेस सरकारने शेतकर्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज घोषित करूनही हा पैसा शेतकर्यांना मिळाला का ? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, शेतकर्यांना ना योजनेचा लाभ झाला, ना पॅकेजचा पूर्ण पैसा मिळाला. पैसा, पद आणि अधिकार असे सर्व काही असतांना शरद पवारांसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी स्वतःचे पद अन् अधिकार यांचा वापर शेतकर्यांच्या कल्याणासाठी केला नाही. आयुष्यभर शेतकर्यांच्या नावाने राजकारण केले; पण त्यांच्या पदरात शेवटपर्यंत काहीच पडू दिले नाही.
मोदींचे कृषी हितावह निर्णय !
वर्ष २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदी यांच्या सरकारने जेवढे शेतकरी हिताचे निर्णय घेतले, तेवढे निर्णय गेल्या ६० वर्षांत घेतले गेले नाहीत. मोदी सरकारने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, रब्बी आणि खरीप पिकांच्या किमान हमीभावात आतापर्यंत अनेक वेळा वाढ केली. खतांवरील सवलत कायम ठेवत शेतकर्यांवर त्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली. ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलची खरेदी चालू केली. शरद पवार कृषीमंत्री असतांना त्यांच्या सरकारने आधारभूत किमतीवर ३ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले होते. मोदी यांनी ९ वर्षांच्या काळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारपेक्षा ४ पट धान्याची खरेदी केली. वर्षांतून ३ वेळा शेतकर्यांच्या खात्यात २ सहस्र रुपये जमा केले.
विश्वसनीयता हवी !
देशातील शरद पवार यांचे पूर्ण राजकारण धरसोडीचे आणि विश्वासघातकीपणाचे राहिले आहे. पवार बोलतात एक आणि करतात दुसरेच. ‘पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत’, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. शरद पवार प्रथम मुख्यमंत्रीपदाच्या आसंदीत बसले, ते त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ! त्यांची ही बंडखोरी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची पहिली सर्वांत मोठी राजकीय बंडखोरी होती. या बंडखोरीची गोष्ट एखाद्या ‘राजकीय भूकंपा’हूनही न्यून नाही. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे, नवाब मलिक, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल अशा अनेक नेत्यांवर भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप आहेत. यातील छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते कारागृहातही जाऊन आले आहेत. त्यामुळे ज्या पक्षातील नेते भ्रष्टाचार आणि घोटाळे करून स्वतःचा स्वार्थ साधतात, असे नेते शेतकर्यांच्या हिताचे कार्य कधी करतील का ? त्यामुळे अशा भ्रष्ट पक्षांवरच जनतेने बहिष्कार घालून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे.
‘झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही’, असे म्हणतात. पवार यांची स्थिती नेमकी अशी आहे. त्यांना सर्व गोष्टी ठाऊक असतांनाही ते झोपेचे सोंग घेत आहेत. त्यांनी ठरवले असते, तर देशातील शेतकर्यांचेच नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचे निर्णय ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री, तसेच केंद्रात कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री असतांनाही घेऊ शकले असते; पण त्यांनी काहीच केले नाही; कारण त्यांच्या दृष्टीने पक्ष आणि स्वत:सह कुटुंबाचे कल्याण हेच लक्ष्य होते. राजकारणात विश्वसनीयता ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानुसार देशातील जनतेचा मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मोदी जेव्हा शरद पवार यांच्यावर टीका करतात, तेव्हा त्यात तथ्य असते. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.