दि‍वसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भिवंडीत ३ गोदामांना आग; गुंगीचे चॉकलेट देऊन लुटले… आतंकवाद्यांच्या संदर्भात खोटे ट्वीट… क्षुल्लक वादात ५ जण गंभीर घायाळ

भिवंडीत ३ गोदामांना आग !

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीतील गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागली. या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामांसह चपलेचे गोदाम अशी तिन्ही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमनदलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.


गुंगीचे चॉकलेट देऊन लुटले !

लोकहो, अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

वाशी – येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ वाहनचालक परवाना काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला एकाने गुंगी आणणारे चॉकलेट दिले. त्यानंतर तरुण बेशुद्ध पडल्याने त्याचा भ्रमणभाष, रोख रक्कम आणि चांदीची साखळी चोरून पलायन केले. अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


आतंकवाद्यांच्या संदर्भात खोटे ट्वीट ! 

असा खोडसाळपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! 

 

प्रतीकात्मक छायाचित्र

बोईसर – जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये ४ संशयित आतंकवादी साधूच्या वेशात असल्याचे ट्वीट रेल्वेच्या ट्विटर खात्यावर करण्यात आले होते. त्या साधूंचे छायाचित्रही देण्यात आले होते. एक्स्प्रेस पालघर रेल्वेस्थानकात आल्यावर साधू वेशातील चौघांना पोलिसांनी कह्यात घेतले; पण त्यांच्या चौकशीत तथ्य आढळले नाही. यासाठी १५ मिनिटे एक्सप्रेस थांबवण्यात आली होती. ट्वीट करणार्‍याचा शोध घेण्यात येत आहे.


क्षुल्लक वादात ५ जण गंभीर घायाळ ! 

समाजातील संयम संपत चालल्याचे लक्षण ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

बोईसर – येथे नवरात्रोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत आवडते गाणे लावण्यावरून दोन गटांत वाद झाला. यात ५ जण गंभीर घायाळ झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी कोयत्याने वार करण्यात आले.