आहार संतुलित असेल, तर औषधांची आवश्यकता नाही ! – वैद्य सुविनय दामले 

‘आयुर्वेद महोत्सवा’चा द्वितीय दिवस ! 

वैद्य सुविनय दामले

कोल्हापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आयुर्वेदाचे नियम जर आपण नियमित पाळले, तर आपण रोगांपासून लांब राहू शकू. आयुर्वेदात ‘व्हिटॅमिन’ ही संकल्पना नसून ‘रसायन’ ही संकल्पना आहे. आता मात्र आपण आवश्यकता नसतांनाही भरमसाठ ‘व्हिटॅमिन’ (जीवनसत्त्वे) घेतो. ‘मधुमेह’, ‘रक्तदाब’ यांसारखे रोग पूर्वी नव्हते. आज आपण पाश्चात्त्य जीवनशैलीप्रमाणे वागत आहोत. आपण जर आयुर्वेदाप्रमाणे संतुलित आहार घेतला, तर आपल्याला औषधांची आवश्यकताच भासणार नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांनी केले. ते ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित ‘आयुर्वेद महोत्सवा’त २८ ऑक्टोबर या दिवशी ‘निरोगी जीवनाकडे जाण्याचा मार्ग आणि आपत्कालीन आजारावर घेण्याची घरगुती औषधे’ यावर बोलत होते.

१. जे चुकीचे आहे त्या विरोधात कुणी बोलत नाही; मात्र मी केवळ आयुर्वेदात जे सांगितले आहे तेच सांगतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आम्ही एका रुग्णाच्या रक्तातील साखरेची चार वेगवेगळ्या ‘लॅब’ मध्ये पडताळणी केली असता त्यातील अहवाल वेगवेगळे आले. या संदर्भात विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात केवळ मी सत्य सांगितले म्हणून माझ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सत्य पुढे येण्यासाठी प्रसंगी कारागृहवास पत्कारावा लागला, तरी चालेल; मात्र सत्यासाठी मी अंतिम क्षणापर्यंत लढत राहीन. ‘कोलेस्टेरॉल’, तसेच अन्य काही रोग हे काही वैद्यकीय आस्थापनांनी बनवलेले बागुलबुवा आहेत. यात मनुष्य गुरफटून जातो आणि आयुष्यभर आधुनिक वैद्यांची औषधे घेत रहातो. यातून त्याची कधीही सुटका होत नाही.

२. एकादशीच्या दिवशी एका रुग्णाला मी रक्त शोषून घेण्यासाठी जळू चिकटवल्या, तर त्या चिकटल्या नाहीत. यावरून जळूंनाही ‘एकादशी’ आहे हे कळते, हेच सिद्ध होते. भारतीय संस्कृतीत तिथीला महत्त्व असून प्रत्येक तिथीला एक सण जोडलेला आहे. जसे गणेशचतुर्थी, नागपंचमी, श्री रामनवमी, विजयादशमी यांसह अन्य सण हे तिथींनाच जोडलेले आहेत.

३. भारतीय संस्कृती ही महान असून शालेय जीवनातच रामायण, महाभारत शिकवणे आवश्यक आहे; मात्र सध्या तसे होत नाही. मुले संस्कारीत होण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदात ‘कसे जगावे ? आणि कसे मरावे ?’ हेही सांगितलेले आहे.