घटस्फोट प्रकरणातील ‘डेझर्शन’चे महत्त्व !

(‘डेझर्शन’, म्हणजे सोडून जाणे, त्याग करणे, स्वेच्छेने त्याग करणे, कुटुंबव्यवस्था सोडून स्वखुशीने आपल्या पित्याच्या घरी जाऊन किंवा स्वतःच्या इच्छेने कुठेही रहाणे.)

१. घटस्फोट मिळण्यासाठी ठोस कारणे आणि पुरावे आवश्यक !

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

‘विवाहाच्या गाठी ब्रह्मदेव वर स्वर्गात मारतो’, असे म्हटले जाते. जेव्हा हे लग्न काही कारणाने तोडायची वेळ येते, तेव्हा ‘न्यायदेवते’कडे न्याय मागावा लागतो, ही वस्तूस्थिती आहे. न्यायालयातून घटस्फोट मिळण्यासाठी ठोस कारणे आणि पुरावे द्यावे लागतात अन् ते सिद्ध करावे लागतात. त्यानंतर कुठे घटस्फोट मिळतो. घटस्फोटाचे दोन प्रकार असतात.

अ. कसेंट डिव्होर्स (परस्पर संमतीने घटस्फोट)

यामध्ये दोघांनाही परस्पर संमतीने घटस्फोट घेता येतो. दोघांचीही सहमती असेल, तर न्यायालयाला घटस्फोटाची ‘डिक्री’ (निर्णय) काढायला पुष्कळ वेळ लागत नाही; कारण दोघांनाही घटस्फोट हवाच आहे, तर न्यायालय त्यावर वेळ कशाला काढेल.

आ. कंटेस्ट डिव्होर्स (घटस्फोटाला विरोध)

हा घटस्फोट एकाला हवा असतो, तर एकाला नको असतो. अशा स्थितीत घटस्फोट हवा असणार्‍याला तो खटला लढवून मिळवावा लागतो. या ‘कंटेस्ट डिव्होर्स’ प्रकारात अनेक बनावट मानहानीकारक गोष्टी, पटू न शकणार्‍या आणि सिद्धही करता न येणार्‍या अशा खर्‍या-खोट्या गोष्टी मांडल्या जातात.

२. न्यायालयात ‘डेझर्शन’ सिद्ध करणे अत्यंत कठीण !

यातील ‘डेझर्शन’ नावाचा प्रकार पुष्कळ महत्त्वाचा असतो. ‘डेझर्शन’ म्हणजे सोडून जाणे, त्याग करणे, स्वेच्छेने त्याग करणे, कुटुंबव्यवस्था सोडून स्वखुशीने आपल्या पित्याच्या घरी जाऊन किंवा स्वतःच्या इच्छेने कुठेही रहाणे. एखादी महिला स्वतःचे घरदार सोडून स्वेच्छेने तिच्या आई-वडिलांकडे किंवा माहेरी जाऊन रहात असेल, तर या प्रकाराला कायदेशीर भाषेत ‘डेझर्शन’ असे म्हणतात. अशी विवाहित महिला २ वर्षांहून अधिक काळ स्वत:चे घर सोडून रहात असेल, तर घटस्फोट मिळवण्याच्या कामी याचा पुष्कळ उपयोग होतो. याला ‘ग्राउंड्स् फॉर डिव्होर्स’ असे म्हणतात. अनेक पार्श्वभूमींपैकी ‘डेझर्शन’ ही एक पार्श्वभूमी असते. ज्याला घटस्फोट हवा असतो, तो ‘माझी पत्नी स्वतःहून संसार टाकून लांब गेलेली आहे. ती स्वेच्छेने गेली असून पुष्कळ प्रयत्न करूनही परत येत नाही. त्यामुळे तो घटस्फोट मान्य करा’, असे म्हणणे न्यायालयात मांडतो. हे सत्य असेल, तर योग्यच आहे. त्याला घटस्फोट मिळेलही; परंतु अनेक ठिकाणी ज्या विवाहिता लांब माहेरी गेलेल्या असतात, त्या न्यायालयात असे नमूद करतात की, सासरच्यांनीच तिला हाकलून दिलेले आहे आणि हिंसाचाराच्या भीतीने त्या तेथे परत येऊ शकत नाहीत. या संदर्भात न्यायालयात अनेक ‘वकिली क्लृप्त्या’ सादर केल्या जातात. येथे न्यायालयाचा खरा कस लागतो आणि हे सर्व सिद्ध व्हायला पुष्कळ वेळ लागतो. यात सर्वांची पुष्कळ हानी होते.

३. घटस्फोट प्रकरणात एकमेकांना धडा शिकवण्यात दोन्ही पक्षकारांची हानी !

घटस्फोट हवाच असतो; पण तो स्वस्तात द्यायचा नसतो. त्यासाठी आर्थिक मागणी वाढवून समोरच्याला पोटगी किंवा अशा अनेक खटल्यांमध्ये अडकवून न्यायदानाला वेठीस धरण्याचे अनेक प्रयत्न न्यायालयात बघायला मिळतात. यात विशेषतः ‘आता तुला चांगलाच धडा शिकवतो किंवा शिकवते’, या हट्टापायी ते स्वतःच चांगला धडा शिकतात. ‘डेझर्शन’ कायदेशीरपणे खरे असेल, तर जो व्यक्ती त्याच्या पत्नीने ‘डेझर्शन’ केलेले आहे, असे म्हणतो, तेव्हा ते सिद्ध करण्याचे दायित्व त्याच्यावर असते. कायद्याच्या भाषेत त्याला ‘बर्डन ऑफ प्रुफ’ (पुराव्याचे ओझे) असे म्हणतात. ‘डेझर्शन विदाउट रिझनेबल कॉज’ (वाजवी कारणाविना त्याग), तसेच ‘विदाउट कंसेंट ऑर विश ऑफ द डेझर्टेड स्पाऊस’, (जोडीदाराच्या संमतीविना किंवा इच्छेविना) हे न्यायालयात सिद्ध व्हावे लागते.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.