सोलापूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला धर्मप्रेमींचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद !
१. एका धर्मविरोधी पक्षाच्या नेत्याने हिंदु राष्ट्राविषयीचे ग्रंथ विकत घेणे आणि मतदार संघातील हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगणे
‘एकदा जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करत असतांना माझी एका धर्मविरोधी पक्षाच्या नेत्यांशी भेट झाली. ‘मी हिंदु जनजागृती समितीची कार्यकर्ती आहे’, असे कळल्यावर त्यांनी स्वतःची ओळख लपवली; पण हिंदु राष्ट्राविषयीचे ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी लगेचच ४ ग्रंथ विकत घेतले आणि ‘आमच्या मतदार संघातील हिंदुत्वनिष्ठांसाठी एका बैठकीचे आयोजन करतो’, असे ते म्हणाले.
२. धर्मशिक्षणवर्गातील एका शिक्षिकेला एक विषय चुकीचा वाटणे आणि त्यानंतर त्याविषयी प्रबोधन केल्यावर त्या प्रभावित होणे
मी धर्मशिक्षणवर्गात विषय मांडत असतांना आरंभी एक ताई म्हणाल्या, ‘‘शाळांमधून धर्म शिकवला जात नाही’, असे तुम्ही म्हणता. ते मला चुकीचे वाटते. आमच्या (इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत आम्ही सगळे सण साजरे करतो. काळानुसार आपल्याला पालटावे लागते.’’ तेव्हा मी ‘शाळांमधून ख्रिस्तीकरण कसे चालू आहे ?’, हे सांगितल्यावर त्यांना ते पटले. साधना, पितृदोष इत्यादी विषय सांगितल्यावर त्या प्रभावित झाल्या. शेवटी त्या म्हणाल्या, ‘‘तुमचे कार्य महान आहे. ही काळाची आवश्यकता आहे.’’
३. धर्मप्रेमींचा धर्मकार्यातील सहभाग !
अ. एक धर्मप्रेमी समितीच्या कार्यक्रमासाठी विद्युत् आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य देतात, तसेच सेवाही करतात. मध्यंतरी समितीच्या वतीने एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते सहभागी झाले होते. आंदोलन चालू असतांना त्यांच्या लक्षात आले की, ध्वनीवर्धकाचा आवाज अपेक्षित अंतरापर्यंत पोचत नाही. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला या ‘मेगाफोन’ची तपासणी करायची आहे.’’ त्यानंतर ते तातडीने एका ‘शोरूम’मध्ये गेले. तेथे त्यांनी ‘मेगाफोन’ची तपासणी केली. त्यानंतर ‘मेगाफोन’चा आवाज चांगला येऊ लागला आणि आंदोलनही यशस्वी झाले.
आ. एक धर्मप्रेमी भांडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते बाहेरगावी असूनसुद्धा ‘त्यांच्या असोसिएशनचे सदस्य हिंदूसंघटन मेळाव्यात सहभागी व्हावेत’, यासाठी त्यांनी तळमळीने सर्वांना संपर्क केले आणि मलाही संपर्क क्रमांकांसहित त्यांच्या नावांची सूची पाठवली. त्यांच्या असोसिएशनचे ६ सदस्य मेळाव्याला आले होते.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कृपेमुळे समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे’, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. राजश्री देशमुख, सोलापूर (२१.७.२०२३)