स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने साधकाला होणार्या वाईट शक्तींच्या त्रासात घट होणे
१. वाईट शक्तींच्या त्रासात वाढ झाल्याने साधकाची स्थिती नकारात्मक होणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी उपायांसमवेत स्वयंसूचना सत्रे करण्यास सांगणे
‘ऑगस्ट २०२३ पासून मला होणार्या वाईट शक्तींच्या त्रासात पुष्कळ वाढ झाली होती. त्यामुळे मला सेवा आणि नामजपादी उपाय करता येत नव्हते. त्यामुळे माझे मन अतिशय नकारात्मक झाले होते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना माझ्यासाठी प्रतिदिन उपाय करावे लागत होते. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नकारात्मक स्थितीतून बाहेर येण्यासाठी मला उपायांसमवेत स्वयंसूचना सत्रे करण्यास सांगितले होते.
२. स्वयंसूचना सत्रे करणे आणि नामजपादी उपाय यांमुळे मानसिक अन् आध्यात्मिक स्थिती सुधारणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे मी नकारात्मक मानसिक स्थितीतून सावरण्यासाठी स्वयंसूचना सत्रे करणे आरंभ केले. काही दिवसांनी स्वयंसूचना सत्रे करणे आणि नामजपादी उपाय यांमुळे माझी मानसिक अन् आध्यात्मिक स्थिती सुधारू लागली.
३. स्वयंसूचना सत्रे करणे आणि स्वभावदोषांमुळे होणार्या चुकांचे लिखाण करणे यांमुळे मानसिक स्थिती सकारात्मक होऊन ३ दिवस आवरण न येणे
२८.९.२०२३ या दिवशी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्याकडे आध्यात्मिक उपायांसाठी गेलो होतो. तेव्हा त्यांना माझ्यावर आवरण अजिबात जाणवले नाही. त्यांना माझ्या कुठल्याही कुंडलिनीचक्रावर त्रास जाणवत नव्हता. तेव्हा सद्गुरु काकांनी मला असे होण्याचे कारण विचारले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘१५ दिवस सलग स्वयंसूचना घेणे आणि स्वभावदोषांमुळे होणार्या चुकांचे लिखाण करणे यांमुळे माझी मानसिक स्थिती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे माझ्यावर आवरण आले नाही. त्याचप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे गेला एक आठवडा मला एकाग्रतेने सेवाही करता आली होती.’ स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे ३ दिवस माझ्यावर आवरण आले नाही, तसेच त्रासही अगदीच अल्प प्रमाणात होत होता.
४. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने मन सकारात्मक राहून वाईट शक्तींना साधकांना त्रास देणे कठीण जात असल्याचे भगवंताने लक्षात आणून देणे
भगवंताने या अनुभूतीतून मला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यात किती महत्त्व आहे ?’, हे लक्षात आणून दिले. वाईट शक्ती मनावर आक्रमण करून मनाची नकारात्मकता वाढवतात. त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती, घडणारे प्रसंग आणि सहसाधक यांच्याकडे आपण नकारात्मकतेने पाहू लागतो. त्यामुळे आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ होते. यावर मात करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने मन सकारात्मक राहून वाईट शक्तींना साधकांना त्रास देणे कठीण जाते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच मला या अनुभूतीतून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आणून दिले, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला स्वयंसूचना सत्रे करण्यासाठी उद्युक्त केले, त्यासाठी मी त्या दोघांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘यापुढे सातत्याने आणि चिकाटीने मला स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची बुद्धी होवो’, ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३०.९.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |