जालना येथे मराठा आरक्षणावरून तहसीलदारांची गाडी फोडली !
मराठवाड्यात ‘एस्.टी’ची सेवा ठप्प, ७ आगारांतील ३८० बसगाड्यांच्या २ सहस्र ८०० फेर्या रहित !
जालना – मराठा आरक्षणासाठी मराठवाडा येथे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जालना येथे महिला तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे, तर नांदेड आणि बीड जिल्ह्यांत बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बसगाड्या सेवा रहित करण्यात आली आहे. दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यांतील बसगाड्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. या ४ जिल्ह्यांत एकूण ३० आगार असून अंदाजे तेथील २ सहस्र ८०० हून अधिक फेर्या रहित करण्यात आल्या आहेत. बाजीउम्रद येथील भ्रमणभाष टॉवरवर चढलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात यावे, अशी गावकर्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळाजवळून जाणार्या तहसीलदारांची गाडी अडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.