गोव्याला ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात मिळाले दुसरे सुवर्ण
|
(‘पेंचाक सिलाट’ हा कराटे, जुडो यांसारखा स्वसंरक्षणाचा एक प्रकार (मार्शल आर्ट))
पणजी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याच्या करिना शिरोडकर हिने ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात जम्मू-काश्मीरच्या जिया चौधरी हिचा ३०-१५ गुणांच्या फरकाने पराभव करत गोव्याला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. गोव्यासाठी यापूर्वी मॉडर्न पेंटथलॉनमध्ये बाबू गावकर याने सुवर्ण पदक जिंकले होते.
२०० मीटर ‘फ्रीस्टाईल’ या जलतरण क्रीडा प्रकारात गोव्याच्या संजना प्रभुगावकर हिने रौप्य पदक प्राप्त केले आहे. यामुळे गोव्याला आतापर्यंत २ सुवर्ण, ५ रौप्य आणि २० कास्य पदके मिळून एकूण २७ पदके प्राप्त झालेली आहेत. यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याने पदकांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
पूर्वीश्रमीच्या तायक्वांदोपटू असलेल्या करिना शिरोडकर हिने राष्ट्रीय पातळीवर ‘पेंचाक सिलाट’ क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच पदक प्राप्त केले आहे. यापूर्वी तिने तायक्वांदो खेळात पदके जिंकलेली आहेत. २९ ऑक्टोबर या दिवशी गोव्याला ‘पेंचाक सिलाट’ खेळात पुरुष गटात ३ कांस्य पदके मिळाली. सागर पालकोंडा याने ८५-९० किलो वजनगटात, सिराज खान याने ९०-९५ किलो वजनगटात आणि महंमद इरफान खान याने ६५-७० किलो वजनगटात बाजी मारली. ‘पेंचाक सिलाट’ खेळात गोव्याला आतापर्यंत १ सुवर्ण, १ रौप्य आणि १० कांस्य पदके मिळाली आहेत.