पुणे ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीमध्ये अनेक त्रुटी !
पुणे – शहरातील ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीतील अनेक त्रुटी ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी चालू कामांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केले असून त्रुटी सामान्य असून त्यांची दुरुस्ती चालू असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘महामेट्रो’च्या अधिकार्यांशी चर्चा केली, त्या वेळी ते बोलत होते. (मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार नाही का ? अशा चुका मान्य करण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) दानवे यांनी ‘महामेट्रो’च्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. या वेळी ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे हे उपस्थित होते. ‘मेट्रो’ची सुरक्षितता जनतेसाठी महत्त्वाची असून त्यात त्रुटी आहेत का ? असा प्रश्न त्यांनी या वेळी केला. मेट्रोच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित करणार्या व्यक्ती तज्ञ आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.