काळ्या पैशांवर आधारित पत्रकारितेच्या खांद्यावर नैतिकतेचा झेंडा, हा विनोदच ! – ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर
भाऊ तोरसेकर यांना ‘काकासाहेब पुरंदरे स्मृती’ पुरस्कार प्रदान
मुंबई – मालकाचा लाभ आणि त्याचा हेतू साध्य करण्याचे एक साधन म्हणून माध्यमांचा राजरोस वापर होत असल्याने सध्या पत्रकारितेची दुर्दशा झालेली आहे. काळ्या पैशाचे अधिष्ठान असलेली पत्रकारिता आविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन नैतिकतेची भूमिका मांडते, हाच मोठा विनोद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर सभागृहात केले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून प्रबोधनाचे कार्य केल्याविषयी केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते श्री. भाऊ तोरसेकर यांना ‘काकासाहेब पुरंदरे स्मृती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले…
१. हल्ली वृत्तपत्राचे मालक तेच संपादक असे कितीजण आहेत ! एखादा भांडवलदार कोट्यवधी रुपयांची मोठी भांडवली गुंतवणूक करून वर्तमानपत्र किंवा वाहिनी चालू करतो आणि आपला पट्टा बांधून पत्रकाराला कामाला ठेवतो. त्यामुळे डरकाळी फोडण्याऐवजी तो केविलवाणे भुंकण्याचे काम त्याच्या इशार्यावर करत असतो.
२. पत्रकारिता करतांना अनुल्लेखाने न मारता विषयाला थेट भिडायचे, हे मी माझ्या पत्रकारितेचा प्रारंभ करतांना आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मार्मिक’चे संपादन करतांना शिकलो, माझ्या पत्रकारितेचा ‘डी.एन्.ए.’ तोच आहे.
३. सार्वजनिक जीवनात वावरणार्यांना किंवा लोकमतावर निवडून आलेल्यांना धमकावण्याचा उद्योग हे असे मूठभर लोक करत होते; पण तंत्रज्ञान विकसित झाले आणि सोप्या रूपात सामान्य माणसालाही आपला आवाज जगासमोर मांडण्याची तुटपुंजी का होईना, संधी मिळाली, त्यातून पत्रकारिता वा माध्यमांचे स्वरूप निरूपयोगी झाले.
४. पत्रकार शहाणा नव्हे, तर पत्रकारिता सामान्यांना समजेल अशी असायला हवी.
संपादकीय भूमिकापत्रकारिता क्षेत्रातील सर्वांनीच भाऊ तोरसेकर यांच्या विधानाचा गांभीर्याने विचार करावा ! |