छत्रपती संभाजीनगर येथे मुलांच्या साहाय्याने चालणारे बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त !

७ जणांना अटक, ५ मुलांकडे ५०० च्या नोटा !

छत्रपती संभाजीनगर – ३५ सहस्र रुपयांच्या खर्‍या नोटांच्या मोबदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मेडिकल, तसेच किराणा दुकानांतून चलनात आणणार्‍या ७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४१९ नोटा जप्त केल्या असून ९० सहस्र रुपयांच्या १८१ बनावट नोटा बाजारपेठेत आहेत. ७ पैकी ५ जण विधीसंघर्षग्रस्त मुले असून मुख्य सूत्रधार पसार आहे. अल्पवयीनांना हाताशी धरून हा उद्योग चालू होता.

टोळीने ऑक्टोबरमध्ये ६०० नोटा बाजारात चालवल्या. या वेळी एकाही दुकानदाराच्या हे लक्षात आले नाही; मात्र खबर्‍याने पोलिसांना माहिती दिल्यावर हालचाली चालू झाल्या. आरोपींमधील देवेंद्र उपाख्य भय्या मोरे आणि राहुल जावळे यांना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे वापर करणे, दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !