खेडमध्ये २७ सहस्र रुपयांचा गांजा पकडला : संशयित पोलिसांच्या कह्यात
५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
खेड – तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त करून रवींद्र जाधव (घाटकोपर, मुंबई) या संशयिताला कह्यात घेतले आहे. २८ ऑक्टोबरच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.
एका ‘इको’ गाडीतून गांजा विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि अन्य पोलिसांच्या पथकाने महामार्गावर पाळत ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीला थांबवले. या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये २७ सहस्र रुपये किमतीचा एका प्लास्टिक पिशवीमध्ये १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीची गाडी, १२ सहस्र रुपये किमतीचे ३ भ्रमणभाष संच आणि ५ सहस्र ०९० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येथील पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.