पोलीस ठाणे सद्भावनेचे केंद्र ठरावे ! – पालकमंत्री उदय सामंत
पोलीस वसाहतींसाठी १२९ कोटी संमत
रत्नागिरी (जिमाका)- खेड, दापोली आणि मंडणगड पोलीस ठाणे अन् वसाहतींना निधी दिला जाईल. जिल्ह्यातील सर्वच पोलीस वसाहती अत्यंत चांगल्या पद्धतीच्या असाव्यात, याच भावनेतून रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी १२९ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे हे सद्भावनेचे केंद्र ठरले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
दापोली पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पद्मश्री दादासाहेब इदाते, माजी ॲडमिरल विष्णु भागवत उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘‘दापोली शहराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार्या ‘सीसीटीव्ही’च्या मागणीला संमती देत आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती असेल, तर गुन्हे कुठेही घडणार नाहीत. पोलिसांनी समन्वयातून मार्ग काढावा. तक्रार आल्यास तिच्याकडे कुटुंबातील तक्रार म्हणून पोलिसांनी पहावे.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पवार म्हणाले, ‘‘सागरी सुरक्षेसाठी २५ बोटी असून, त्यातील काही बोटी बंद आहेत. जिल्हा नियोजनामधून यासाठी सुविधा करता आली, तर त्याचा सागरी सुरक्षेसाठी लाभ होईल.’’