क्रीडा स्पर्धेत गोव्याची नवीन विक्रमाच्या दिशेने कूच
|
पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्याने झारखंड येथे वर्ष २०११ मध्ये झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण १६ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदके) प्राप्त केली होती. ३७ व्या क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवणार्या गोव्याने २८ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण १६ पदके जिंकली असून झारखंडमधील १६ पदकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यामध्ये ‘मॉडर्न पेंटॅथलॉन’ आणि ‘पेंचाक सिलाट’मध्ये प्रत्येकी ७, तर ‘नेटबॉल फास्ट’ आणि वजन उचलण्याच्या स्पर्धेत प्रत्येकी १ पदक प्राप्त केले आहे.
गोव्याला २८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी पेंटॅथलॉनमधील पुरुषांच्या ‘बायथल’ प्रकारात गोव्याला सांघिक कांस्य पदक मिळाले. या संघात युग दळवी, शिवनाथ माजिक आणि नारायण गिरी यांचा समावेश आहे. या संघाने १ सहस्र ६०० मीटर धावणे, २०० मीटर जलतरण आणि पुन्हा १ सहस्र ६०० मीटर धावणे या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला.
गोव्याला नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची संधी
३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे आणि स्पर्धेत गोव्याला पदके मिळण्याची शक्यता असलेले खेळ अद्याप शिल्लक आहेत. यामध्ये तायक्वांदो, स्क्वे मार्शल आर्ट, वुशू, बॉक्सिंग, जलतरण, यॉटिंग, फुटबॉल आदी खेळांचा समावेश आहे.