आयुर्वेदाच्या वनस्पतींच्या व्यापाराची संधी शेतकर्‍यांना जागतिक स्तरावर उपलब्ध ! – प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट 

‘आयुर्वेद महोत्सवा’चा द्वितीय दिवस ! 

‘शेतकरी प्रशिक्षण वर्गा’त मार्गदर्शन करतांना प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट, तसेच मान्यवर

कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – भारत हा कृषीप्रधान देश आहे. आयुर्वेद हा भारताचा मोठा ठेवा असून प्रत्येक रोगाला बरे करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदाच्या औषधांची व्यापारी तत्त्वाची बाजारपेठ शेतकर्‍यांना जागतिक स्तरावही उपलब्ध आहे; मात्र त्यांचे प्रमाणीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला त्याचे योग्य मूल्य आणि बाजारपेठ शोधता आली पाहिजे. मध्यप्रदेश राज्यात निमजसारख्या ठिकाणी औषधी वनस्पतींची मोठी बाजारपेठ असून तिथे कित्येक टन उलाढाल होते. तशी बाजारपेठ महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’ने प्रयत्न करावेत, असे आवाहन सावित्रीबाई फुले, पुणे विश्वविद्यालयाचे प्रमुख संशोधक, तसेच क्षेत्रीय संचालक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी केले.

ते कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित औषधीय वनस्पती मंडळ आणि आयुष मंत्रालय यांच्या विद्यमाने ‘आयुर्वेद महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी ‘आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवड आणि संवर्धन’ या विषयावर ‘शेतकरी प्रशिक्षण वर्गा’त बोलत होते. या प्रसंगी देहली येथील आयुष मंत्रालयाचे संचालक डॉ. सी.पी. शुक्ल यांनीही मार्गदर्शन केले.

प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट पुढे म्हणाले, ‘‘केंद्रशासनाच्या वतीने आयुर्वेदाच्या वनस्पतींचे बाजारभाव समजण्यासाठी ‘इ चरक’ नावाचे ‘ॲप’ सिद्ध केले असून त्याचा शेतकर्‍यांनी लाभ करून घ्यावा. परंपरागत शेती करतांना ‘आयुर्वेदाच्या वनस्पतींची शेती आपण कशी करू शकतो ?’, याचा विचार शेतकर्‍यांनी करावा. ही शेती करतांना फसगत होण्याची शक्यता गृहीत धरून शेतकर्‍यांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन, वनस्पतींची रोपे, प्रशिक्षण आम्ही देऊ.’’ या प्रसंगी आयोजक श्री. प्रदीप भिडे, ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. शेखर खोले, कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत भुसारी, सचिव श्री. अनिल कातोरे, श्री. संजय आपटे, श्री. शशिकांत कुलकर्णी, श्री. अभिजित डुबल, डी.जी. नाईक, श्री. सागर जाधव, श्री. सुधाकर बोरूडे, श्री. आदिनाथ घोंगडे यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. अक्षय देशमुख आणि डॉ. किरण अभ्यंकर यांनी स्वत: व्यावसायिक स्तरावर आयुर्वेदाची शेती कशा प्रकारे केली ? आणि त्यातील अनुभवकथन केले. या वर्गात विविध शेतकर्‍यांनी शंकानिरसन करून घेतले. २८ ऑक्टोबरला सकाळी ‘अनु योगा केंद्रा’च्या योगतज्ञ सौ. अनघा अभिजित डुबल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि उपस्थितांकडून योगासने करवून घेतली.

आयुर्वेदाच्या प्रचारासाठी ग्रंथ दिंडी !

तत्पूर्वी २७ ऑक्टोबरला दुपारी आयुर्वेदाच्या प्रचारासाठी ग्रंथ दिंडी काढण्यात आली.  कार्यक्रम स्थळापासून शहरातील विविध मार्गांवरून जाऊन ती परत कार्यक्रमस्थळी आली. या दिंडीत धन्वंतरीची मूर्ती, आयुर्वेदातील चरक संहिता, विविध ग्रंथ, तुळशीचे रोप यांचा समावेश होता. यात पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रसंगी पू. यादव महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती.

आयुर्वेदाच्या प्रचारासाठी काढलेल्या दिंडीत सहभागी झालेले ‘असोसिएशन’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
आयुर्वेदाच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या दिंडीच्या प्रसंगी उपस्थित पू. यादव महाराज, तसेच ‘असोसिएशन’चे पदाधिकारी, कार्यकर्ते
योगासन वर्गाच्या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवर