समभाग (शेअर) विक्रीच्या बाजारामध्ये गुंतवणूक करत आहात ? सावधान !

‘सध्या अनेक साधक, हितचिंतक आणि मध्यमवर्गीय कुटुंब समभागाच्या (शेअर) बाजारामध्ये दिवाळीच्या निमित्ताने वा अन्य कारणांने मोठी गुंतवणूक करत आहेत. शेअर बाजारामध्ये ओळखीच्या व्यक्ती, नातेवाइक किंवा मित्र यांच्या सांगण्यावरून किंवा विज्ञापने पाहून गुंतवणूक केली जाते, असे लक्षात आले आहे. वास्तविक पहाता शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतांना अनेकांचा संबंधित विषयाचा प्राथमिक अभ्यासही नसतो. केवळ प्रलोभनांना फसून किंवा त्वरित मोठा मोबदला मिळावा, या अपेक्षेने स्वत:ची शिलकीची रक्कम (कॉर्प्स अमाऊंट) शेअर बाजारामध्ये गुंतवली जाते. अनेक गुंतवणुकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, फार थोड्या लोकांना त्याचा परतावा प्राप्त झाला असून पुष्कळ प्रकरणांमध्ये सर्व पैसे बुडाल्याचे लक्षात आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये प्रारंभी काही मर्यादित रकमेचा परतावा प्राप्त झाला; पण कालांतराने त्या गुंतवणूकदारालाही तोटाच सहन करावा लागला आहे. त्यामुळे गुंतवणूक हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी या क्षेत्रातील धोके आणि फसवेगिरी लक्षात यावी, हा या लेखामागचा उद्देश !

१. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक, म्हणजे १०० टक्के जोखीम !

सर्वसाधारणपणे शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची समजली जाते; परंतु विज्ञापनांमुळे त्याची खरी बाजू समोर येत नाही. ‘त्वरित आणि मोठा परतावा, याचाच अर्थ रक्कम बुडण्याची अधिक शक्यता’, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘शेअर बाजारामध्ये पैसे कधीच बुडत नाहीत’, असेच समभागांची खरेदी-विक्री करणारे (शेअर ब्रोकर) सांगतात. नंतर ते असे पर्याय सांगतात की, ज्यात आपली संपूर्ण रक्कम डुबण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने या प्रलोभनांना न फसता सावध होऊन आणि विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यात संरक्षण हमी काहीही नसून केवळ १०० टक्के जोखीम आहे.

२. विविध आस्थापनांच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची नवीन पद्धत

अधिवक्ता नागेश जोशी

सध्या प्रचलित पद्धतीप्रमाणे शेअर बाजारामध्ये थेट नाही, तर विविध गुंतवणूक करणार्‍या आस्थापनांच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. त्यांच्याकडे शेअर बाजाराचे अभ्यासक असून गुंतवणूकदाराला तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळते, असा या आस्थापनांचा दावा असतो. या प्रचलित पद्धतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आस्थापनाचा एक व्यक्ती जोडून दिला जातो आणि त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सर्व जण गुंतवणूक करत असतात. ही प्रक्रिया रितसर केल्यास तसा करारही केला जातो; पण हा करार अभ्यासल्यास असे लक्षात येते की, हा करार एकतर्फी असतो. त्यामुळे गुंतवणुकीतील सर्व जोखीम ही गुंतवणूकदांरावर असते. आपल्याला जोडून दिलेला तज्ञ हा सतत आश्वासन देत रहातो, ‘पैसे बुडाले, तरी तुम्ही काळजी करू नका. मी तुमची हानी लवकरच भरून देतो.’ अशा प्रकारची पोकळ आश्वासने देत तो गुंतवणूक करण्यास मोहात पाडत असतो. आपण त्या व्यक्तीला कधी भेटलेलो नसतो किंवा त्याची आपल्याला काही माहितीही नसते. केवळ ‘रेटिंग’ (मानांकन) विचारात घेऊन आपण त्यांच्या मोहाला फसतो आणि गंडवले जातो. हा नित्याचा अनुभव आहे.

३. पैसे बुडाले, म्हणजे काय झाले ? हे अनेकांना न समजणे

९० टक्के गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे बुडाले, म्हणजे नेमके काय झाले ? हेही ठाऊक नसते. त्यांनी ज्यांच्याकडे पैसे गुंतवणुकीसाठी दिलेले असतात, त्यांनी ‘पैसे बुडाले’ म्हटल्यावर ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात. काही जण त्यांच्याशी वाद घालतात, थोडक्यात स्वतःला त्रास करून घेतात.

४. कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून हानीभरपाई होण्याची शक्यता दुर्मिळ !

पैसे बुडाल्यानंतर अनेकांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. संबंधित व्यक्तीने तोंडी आश्वासन दिलेले असते. त्यालाच शब्दप्रमाण मानून ती व्यक्ती ‘स्वतःची फसवणूक झाली आहे’, असे समजते. त्या व्यक्तीने अनेक कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या केलेल्या असतात. त्या माध्यमातून संबंधित आस्थापन आणि नेमून दिलेली व्यक्ती यांनी कायदेशीर प्रक्रियेतून स्वत:ला संरक्षित केलेले असते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून हानीभरपाई मिळण्याची शक्यता दुर्मिळ होते.

५. गुंतवणूक करतांना अटी आणि नियम पडताळणे आवश्यक !

या क्षेत्रात गुंतवणूक करणे फार जोखमीचे असते. काही गुंतवणूक संरक्षित केली असली, तरी त्यातील अटी आणि नियम पडताळणे आवश्यक असते. त्यामुळे स्वतःची फसवणूक झाल्याचे आपल्याला वाटले, तरी कायदेशीर प्रक्रिया पुष्कळ कठीण आहे. या क्षेत्रातील फसवणुकीविषयी थेट पोलिसांकडे तक्रार न करता ‘भारतीय प्रतिभूती आणि विनियम बोर्ड’ (स्टॉक एक्सचेंज) यांच्याकडे तक्रार करावी लागते. बोर्ड या तक्रारीची चौकशी करते. यात निष्पन्न होण्यासारखे काही नसते; कारण आपण करार करून दिलेला असतो, तसेच संबंधित आस्थापनाने सर्व कागदपत्रे त्यांच्या सोयीची करूनच पुढे पाठवलेली असतात. त्यामुळे या क्षेत्रातील तक्रारी फलदायी ठरत नाहीत.

६. अभ्यास न करता शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळा !

अनेक जण ‘गुंतवणूकदार’ आणि ‘शेअर मार्केटिंग’ यांतील भेद लक्षात घेत नाहीत. काही जण गुंतवणूकदार असतात; पण त्यांचा तो व्यवसाय नसतो. काही जणांचा हा मुख्य व्यवसाय असतो आणि ते त्याच क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ असतात. त्यामुळे त्यांना यातील सर्व बारकावे माहिती असतात. त्यामुळे त्यांना लाभ झाला; म्हणून आपणही गुंतवणूक करणे, हे चूक आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्यक्ष अभ्यास असल्यास किंवा स्वतःचा तोच व्यवसाय असल्यास अशी गुंतवणूक करू शकतो; पण कुणाच्या सांगण्यावरून प्रलोभनांना फसून गुंतवणूक केल्यास तोटा होण्याची शक्यता अधिक असते.

८. कोणतेही विमा संरक्षण नाही !

या क्षेत्रात केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीवर हमी किंवा विमा नसतो, याची नोंद घेणे आवश्यक आहे.

९. छुपी वसुली

प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की, यात मिळणार्‍या लाभावर जवळ जवळ २० टक्के रक्कम ही ‘सर्व्हिस चार्जेस’ आणि ‘आयकर’ वजा करूनच आपल्याला मिळत असते. याचा विचार अनेकांकडून होतांना दिसत नाही. याहूनही काही छुपे व्यय आहेत. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे काहींना लाभही झाला असेल; परंतु शेअरमधील गुंतवणूक ही जोखमीची असल्याने ती विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.’

– अधिवक्ता नागेश जोशी, फोंडा, गोवा.

फसवणूक होऊन पैसे बुडाल्याची काही उदाहरणे

अ. एका धर्मप्रेमीला अनेक वर्षांपासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा अनुभव होता. अधिक लाभ मिळण्यासाठी त्याला शेअर बाजारातील एका सल्लागाराने काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची सर्व रक्कम बुडाली. तक्रार करूनही काही निष्पन्न झाले नाही.

आ. एका साधकाचे जवळचे नातेवाईक या क्षेत्रात काम करत होते. या नातेवाईकाने या साधकाची शेअर बाजारातील एका सल्लागाराशी ओळख करून दिली. त्याने ‘या क्षेत्रात कसे पैसे मिळतात ? पैसे त्वरित दुप्पट करून देतो’, इत्यादी आश्वासने दिली. साधकावर त्या व्यक्तीच्या उच्च रहाणीमानाचा प्रभाव पडला. त्यामुळे साधकाने मालमत्ता विकून मोठी रक्कम त्या व्यक्तीकडे दिली. सदर रक्कम गुंतवणूक करण्यापूर्वी कुणाचाही सल्ला घेतला नाही. परिणामी एवढी मोठी रक्कम बुडाली. नंतर ती परत मिळवण्यासाठी एक नवा संघर्ष चालू झाला.

इ. एका हितचिंतकांचा चांगला व्यवसाय होता. त्यांचे उत्पन्नही चांगले होते. त्याने व्यावसायिक मित्रांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. गुंतवणूक केल्यावर प्रारंभी त्यांना काही रकमेचा परतावा मिळाला; परंतु शेवटी त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर मैत्रीतील कटुताही सोसावी लागली.

ई. या क्षेत्रातील एका व्यक्तीने एका तरुण मुलाला वेगळेच प्रलोभन दिले. त्यांनी ‘भारतामध्ये सोन्याचा भाव कधीही पडत नाही, तो सतत वाढतच जातो. त्यामुळे तुम्ही ‘ऑनलाईन’ सोने घेऊन भरपूर पैसे कमवा’, असे सांगितले. ‘तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल, तेवढीच रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात गुंतवणूक करण्यासाठी मिळेल. त्यातूनही तुम्हाला चांगला लाभ होणार’, असेही सांगितले. त्यानंतर या तरुणाने फार मोठी रक्कम गुंतवली. (एकाच दिवसात पैशाची चिंता संपणार, असे तो सांगत असे. प्रत्यक्षात या व्यवहारामध्ये त्याला मोठा तोटा बसला. त्यामुळे त्याला सदनिका विकून कर्जाची परतफेड करावी लागली.)

उ. एका हितचिंतकाने एक करार काळजीपूर्वक न वाचता त्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे त्याला हानी सोसावी लागली.

– अधिवक्ता नागेश जोशी