जीवनातील शाश्वत आनंदासाठी नर्मदा परिक्रमा ! – मिलिंद चवंडके
अहिल्यानगर – नर्मदेची पायी परिक्रमा हे सर्वांग सुंदर धार्मिक व्रत-तपश्चर्या आहे. आपली पूर्वपुण्याई असेल, तरच नर्मदामैय्या परिक्रमा करू देते. परिक्रमा श्रद्धेने केल्यास जीवनातील शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. नर्मदा परिक्रमा ही शक्तीची उपासनाच आहे, असा स्वानुभव नाथ संप्रदायाचे संशोधक तथा साहित्यिक पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी सांगितला. येथील सनातन धर्मसभेने आयोजित केलेल्या शारदीय व्याख्यानमालेचे पुष्प ‘नर्मदा परिक्रमा’ या विषयावरील प्रवचनाने गुंफतांना ते बोलत होते. धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती दत्तोपंत पाठक गुरुजी यांनी वेदमंत्रांचे पठण चालू करताच सभागृहात चैतन्य निर्माण झाले. प्रा. डॉ. प्रभाताई मुळे यांनी सांगितले, ‘‘आध्यात्मिक पिंड असलेल्या मिलिंद चवंडके यांनी नर्मदेच्या पायी परिक्रमेचे तप पूर्ण करून प्रवचन सेवेचे व्रत घेतले. नाथसंप्रदायावर विशेष संशोधन केल्याने गोरखपूर येथील आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री सरस्वतीदेवीच्या प्रतिमा पूजनाने मिलिंद चवंडके यांनी प्रवचनाचा श्री गणेशा केला.’’
नवनाथांनी केलेली आदिशक्तीची उपासना आजही प्रेरणादायी ! – नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद चवंडके
अहिल्यानगर – नवनाथांनी केलेली आदिशक्तीची उपासना आजही प्रेरणादायी असल्याने नवरात्रोत्सवात नवनाथांचे अधिष्ठान ठेवून देवीची आराधना केली जाते, असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक श्री. मिलिंद चवंडके यांनी केले. येथील सनातन धर्मसभेने गायत्री मंदिरात आयोजित केलेल्या शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘नवनाथांची शक्तीउपासना’ या विषयावर गुंफण्यात आले.
धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री. दत्तोपंत पाठकगुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन झाले. पौरोहित्य श्री. प्रसाद कडेकर यांनी केले. व्याख्यानमालेच्या संयोजिका प्रा. डॉ. प्रभाताई मुळे यांनी परिचयात व्याख्यानमालेचा शुभारंभ श्री. मिलिंद चवंडके यांच्या प्रवचनाने होत असतांना ‘तुळजापूरला देवीकडे निघालेला पलंग सभागृहासमोर येणे’, हा योगायोग असल्याचे सांगितले. गुरुजींच्या हस्ते श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन चवंडके यांना सन्मानित करण्यात आले.