व्यष्टी साधनेच्या आढाव्यानंतर कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने ‘साधनेची गाडी’ चालवत असतांना येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय’ यांविषयी वेगळ्या शब्दांत केलेले वर्णन !
१. साधनेच्या मार्गावरून प्रवास करतांना प्रतिमा न जपता प्रामाणिकपणे स्वतःची चूक सांगायला हवी !
‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात मी सौ. स्वाती संदीप शिंदे यांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला बसल्यावर मला पुढील सूत्रे लक्षात आली. ‘साधनेची गाडी’ चालवत असतांना चूक सांगण्याच्या वाटेवर ‘प्रतिमा जपणे’, हा गतीरोधक आडवा येतो. त्या वेळी गाडीचा वेग न्यून न करता ‘प्रामाणिकपणा’ या गुणाचा आधार घेऊन गतीरोधक पार केला पाहिजे. चूक सांगतांना प्रतिमा आडवी येते. तेव्हा अर्धवट चूक न सांगता प्रामाणिकपणाने चूक सांगून पुढे जायला हवे. तेव्हाच मोक्षाच्या गुळगुळीत आणि अडथळे नसलेल्या सपाट रस्त्यावरून साधनेची गाडी पुढे जात रहाते.
२. ‘मोबाईल’मुळे वेळ वाया जाणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेच्या वाटेवर ‘वेळ वाया घालवू नको’, असा फलक लावून साधकांना सतर्क केलेले असणे
जेव्हा साधनेच्या वाटेत ‘मोबाईल’ची गाडी चालवण्याची वेळ आणि गती वाढते, तेव्हा ‘ब्रेक’वरचा संयम जातो आणि हानीही होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले साधनेच्या वाटेवर ‘आपला वेळ वाया घालवू नको’, असा फलक लावून आपल्याला सतर्क करतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करायला नको. ‘मोबाईल’ची गाडी लक्षपूर्वक, नियोजित वेळेत आणि संयम ठेवूनच चालवायला पाहिजे, नाही तर आपलाच अपघात होईल !
३. व्यष्टी साधनेचा आढावा, म्हणजे ‘व्यष्टी साधनेचे चिकित्सालय’ असल्याने तेथे मनमोकळेपणाने बोलावे, म्हणजे योग्य औषध मिळेल !
आपण व्यष्टी साधनेच्या चिकित्सालयात (आढाव्यात) गेल्यावर जर आपले रोग आणि आपल्याला होत असलेले त्रास (आपल्या चुका अन् स्वभावदोष) यांविषयी मनमोकळेपणाने आणि सहजतेने सांगितले नाही, तर आपले चिकित्सक (व्यष्टी आढावा घेणारे आढावासेवक) आपल्याला योग्य औषध (दृष्टीकोन) आणि उपाययोजना देऊ शकणार नाहीत.’
– कु. शर्वरी हेमंत कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (५.४.२०२१)