ब्रह्मोत्सवाचा मंगलमय सोहळा पहातांना पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे) हिने अनुभवलेली भावस्थिती !

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.२.२०२३)

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे देवतेच्या वेशभूषेत दर्शन होणार असल्याने आनंद होणे

‘११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा होता. ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जातांना मला पुष्कळ आनंद होत होता; कारण गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) मला एखाद्या देवतेच्या वेशभूषेत प्रथमच दर्शन होणार होते. त्यामुळे मला कृतज्ञता वाटत होती.

२. ब्रह्मोत्सवाला गाडीतून जातांना सुचलेले काव्य

ब्रह्मोत्सवाला गाडीतून जातांना मला ‘मामाच्या गावाला जाऊया’, या बालगीतावरून पुढील लहानसे काव्य सुचले.

गुरुदेवांच्या गावाला जाऊया ।

गुरुदेवांच्या गावाला चालली गाडी ।
चैतन्याची वलये हवेत काढी ।। १ ।।

आनंदाने सृष्टी पाहूया ।
गुरुदेवांच्या गावाला जाऊया ।। २ ।।

३. बैठक व्यवस्थेच्या पहिल्या रांगेत बसल्यावर ऊन लागणे; परंतु गुरुदेवांच्या दर्शनाची ओढ असल्याने कसलाही त्रास न होणे

ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी पोचल्यावर मला पहिल्या रांगेत बसण्यास जागा मिळाली. त्यामुळे ‘मला गुरुदेवांना जवळून पहाता येईल’, असे वाटून आनंद झाला. बैठक व्यवस्थेच्या पहिल्या रांगेत ऊन येत होते. त्यामुळे मला उकडत होते. तेव्हा बरेच साधक मला म्हणाले, ‘‘तू मागे बस. तुला त्रास होईल.’’ त्या वेळी मला वाटले, ‘मी गुरुदेवांच्या दर्शनासाठी एवढाही त्रास सहन करू शकत नाही का ?’ विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी कष्ट घेऊन पंढरीला जातात. ‘मला केवळ उन्हात बसायचे आहे’, असा विचार आला आणि मी पहिल्या रांगेतच बसले. मला देवाच्या कृपेने कुठलाही त्रास झाला नाही.

४. गुरुदेव ‘विश्वोद्धारक आणि विश्वपालक’ या रूपात दिसल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे

ब्रह्मोत्सवास आरंभ झाल्यावर शंखनाद होऊ लागला. तेव्हा ‘दर्शन दे रे, दे रे भगवंता ।’ या भक्ती गीताप्रमाणे सर्वांची स्थिती झाली होती’, असे मला जाणवले. सर्व साधक बंद असलेल्या पडद्याकडे पहात होते. पडदा हळूहळू बाजूला झाला. गुरुदेवांचे दर्शन होताच क्षणी माझी भावजागृती झाली. गुरुदेवांचे रूप ‘गुरुरूपात’ म्हणजे ‘केवळ साधकांचे गुरुदेव’ या रूपात न दिसता ‘विश्वोद्धारक आणि विश्वपालक’ या रूपात मला दिसले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

५. गुरुदेवांना पहातांना ‘डोळ्यांमध्ये भावाश्रू आणि ओठावर हसू’, अशी स्थिती होणे

गुरुदेवांचा रथ साधकांसमोरून जातांना माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते. रथारूढ गुरुदेव माझ्यासमोर आले, तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. रथारूढ गुरुदेव माझ्याकडे पहात असतांना मी त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसले. ‘डोळ्यांमध्ये भावाश्रू आणि ओठांवर हसू’, अशी माझी स्थिती झाली. गुरुदेवांनीही माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६. साधकांनी लावलेले उत्सवचिन्ह म्हणजे ‘गुरुदेव प्रत्येकाच्या हृदयात आहेत’, याची त्यांनी प्रचीती देणे

ब्रह्मोत्सवामध्ये प्रत्येक साधकाला एक उत्सवचिन्ह (गुरुदेवांचे छायाचित्र असलेला बिल्ला) दिले होते. उत्सवाला येणार्‍या प्रत्येक साधकाने ते छातीवर लावायचे होते. ते पाहून ‘प्रत्येक साधकाच्या हृदयात गुरुदेव आहेत’, याची गुरुदेवांनी प्रचीती दिली’, असे मला वाटले.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे महालक्ष्मीच्या रूपात दर्शन होणे

रथामध्ये गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आरूढ झाले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पहातांना मला त्यांचे साक्षात् महालक्ष्मीच्या रूपात दर्शन झाले. ‘आपण त्यांची बालके आहोत आणि त्या मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले.

८. गुरुदेवांनी रथातून उतरून मुकुट काढल्यावर ‘ते बाळकृष्ण आहेत’, असे वाटणे

ब्रह्मोत्सव झाल्यानंतर रथातून उतरून चारचाकी गाडीत बसतांना गुरुदेवांनी त्यांच्या डोक्यावरचा मुकुट काढला. तेव्हा ‘ते बाळकृष्णच आहेत’, असे मला वाटले.

९. ब्रह्मोत्सवात अखंड भावजागृती होऊन देहभान हरपणे

ब्रह्मोत्सवात माझी अखंड भावजागृती होत होती. ‘संपूर्ण ब्रह्मोत्सव संपेपर्यंत मला तहान-भूक, उन्हाचा त्रास किंवा पू. आईच्या (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या) कक्षात जावे’, असे कशाचेच भान नव्हते. संपूर्ण ब्रह्मोत्सवात केवळ ‘मी आणि गुरुदेव’ एवढेच मी अनुभवत होते. प्रथमच एवढा वेळ मी अशी भावस्थिती अनुभवली.

हे गुरुदेवा, ‘तुमच्याच अगाध कृपेमुळे हा अविस्मरणीय ब्रह्मोत्सव मला अनुभवता आला. तुमचे व्यापक रूप कसे आहे ?’, याची मला अनुभूती घेता आली. ‘हे गुरुदेवा, ‘मला अशी भावस्थिती अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता.’

– गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे), पुणे. (१५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक