पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा येथे भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त : महानगरपालिकेचे दुर्लक्ष !

नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या बाहेर (पश्‍चिम) मध्यरात्री १.३० वाजता रस्त्यावर फिरणारे कुत्रे

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा या मुख्य शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या अतिशय तीव्र आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेत भटके कुत्रे झुंडीने रस्त्यावर फिरतात. रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना भटके कुत्रे घेरतात. मागील काही दिवसांत या परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावाही घेतला आहे. सातत्याने घडणार्‍या या घटनांनंतरही वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत.

नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम भागात भाजीबाजारातील पूर्ण परिसरात कुत्र्यांचे गट झाले आहेत. भाजीबाजाराच्या गाळ्यांच्या बाहेरील जागा, पादचारी मार्ग, रस्ता येथे दिवसा नागरिकांचा वावर असतो. त्याच जागांमध्ये रात्री मात्र भटक्या कुत्र्यांचा वावर असतो.

हातगाड्यांवर दिवसा फळे-भाज्या आणि रात्री मात्र कुत्रे !

नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या बाहेर (पश्‍चिम) येथे मध्यरात्री भाजीपाला विक्रीच्या हातगाड्यांवर बसलेले भटके कुत्रे

नालासोपारा (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर ज्या ठिकाणी दिवसा हातगाड्यांवर फळे-भाज्या यांची विक्री केली जाते, त्याच गाड्यांवर रात्री भटके कुत्रे झोपतात. या हातगाड्या म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या झोपण्याची नियमितची जागा झाली आहे.

वसई येथे कचर्‍यांच्या गाड्या आणि भटके कुत्रे एकत्र !

वसई दिनदयाळनगर येथे (सकाळी ९ वाजता) महानगरपालिकेच्या कचरा उचलणार्‍या गाड्यांच्या भोवती गोळा झालेली भटके कुत्रे

२८ ऑक्टोबर या दिवशी वसई (पश्‍चिम) येथील दिनदयाळनगर येथील रामरहिम पार्क येथे सकाळी कचरा नेण्यासाठी आलेल्या गाडीच्या अवतीभवती २० भटके कुत्रे जमा झाले होते. वसई येथे सकाळच्या वेळेत कचरा उचलण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या गाड्या ज्या भागांमध्ये जातात, त्या-त्या प्रभागांमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे जमा होतात. यावरून शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या किती असेल, याची कल्पना येतेे.

एकूणच वसई, नालासोपारा या भागांमध्ये कुत्र्यांची समस्या अतिशय गंभीर असूनही वसई-विरार शहर महानगरपालिका ही समस्या सोडवण्यासाठी गंभीर नाही. भटक्या कुत्र्यांची समस्या सुटण्यासाठी महानगरपालिकेचे होत असलेले दुर्लक्ष यांविषयी नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सर्वत्रच्या भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !