(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवासियांच्या मानवाधिकारांचा मान राखा !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन

  • ५७ इस्लामी देशांच्या संघटनेने जम्मू-काश्मीरविषयी केले विधान !

  • कलम ३७० पुन्हा लागू करण्याची भारतविरोधी मागणी !

ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा

नवी देहली – ५७ इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) या संघटनेने जम्मू-काश्मीरवरून पुन्हा एकदा भारतविरोधी विधान केले आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या मूलभूत मानवाधिकारांचा मान राखण्याचे फुकाचे आवाहनही या संघटनेने केले आहे. यासह कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. ओआयसीच्या या विधानामागे पाकिस्तान असल्याचे सांगितले जात आहे. याद्वारे भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांनी प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरचा भारतात विलय झाला होता. काश्मीरची समस्येविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार पावले उचलणे आवश्यक आहे. आम्ही जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराच्या पाठीशी आहोत.

संपादकीय भूमिका

भारताने स्वतःच्या देशात काय करावे आणि काय करू नये ?, हे सांगण्याचा अधिकार या संघटनेला कुणी दिला ? भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपसू नये, असा दम भारताने या संघटनेला दिला पाहिजे !