राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नौका क्रीडा प्रकार होण्यासाठी सरकारला स्थानिक शेतकर्यांनी केले साहाय्य
पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नौका क्रीडा प्रकार पणजी शहरापासून २० कि.मी. अंतरावर शापोरा नदीत होणार आहे. नौका क्रीडा प्रकारासाठी आवश्यक अशी साधनसुविधा अन्य कुठेही उपलब्ध होत नव्हती. या स्पर्धेसाठी २ कि.मी. अंतरापर्यंत स्थिर पाणी असणे आवश्यक असते. शापोरा येथील नदीवर भरती-ओहोटीचा परिणाम होत नाही. अखेर स्थानिक शेतकर्यांनी साहाय्य केल्याने शापोरा नदीत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत वापरत असलेल्या नौका ठेवणे आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा देणे, यांसाठी स्थानिक शेतकर्यांनी साहाय्य केले आहे. स्पर्धेसाठी केवळ २ दिवसांच्या कालावधीत २३ शेतकर्यांनी त्यांची ३० सहस्र चौ.मी. भूमी स्पर्धेच्या आयोजकांना सुपुर्द केली आहे. सुमारे ५ सहस्र चौ. मीटरवरील झाडेझुडपे स्वच्छ करून त्या ठिकाणी रस्ता बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकर्यांनी मोबदल्याची मागणी केलेली नसली, तरी सरकारने सर्व शेतकर्यांना मोबदला देण्याचे ठरवले आहे.
सर्व २९ ठिकाणांवर नागरिकांना प्रवेश मिळणार
पणजी – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्व २९ ठिकाणांवर सर्वसामान्य नागरिकांना प्रेक्षक दालनामध्ये कोणतेही विशेष ओळखपत्र किंवा निमंत्रणपत्रिका यांविना प्रवेश दिला जाणार आहे. गोवा सरकारच्या क्रीडा खात्याच्या सचिवांनी यासंबंधी आदेश काढला आहे. क्रीडा स्पर्धा ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
-
नेटबॉलमध्ये गोव्याला रौप्य पदक
-
गोव्याला आतापर्यंत एकूण ७ पदके
पणजी – ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेटबॉल क्रीडा प्रकारात पुरुष गटात हरियाणा संघाने विजय नोंदवून सुवर्ण पदक, तर गोवा संघाने उपविजेतेपद मिळवून रौप्य पदक प्राप्त केले आहे. हरियाणा संघाने ३३-२२ गुणांच्या फरकाने गोव्याचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेत आतापर्यंत गोव्याला १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ ब्राँझ पदके मिळून एकूण ७ पदके प्राप्त झाली आहेत.