खोडेगाव (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथे मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्‍यांची अंत्‍ययात्रा !

छत्रपती संभाजीनगर – जिल्‍ह्यातील खोडेगाव येथील ग्रामस्‍थांनी २६ ऑक्‍टोबर या दिवशी मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्‍यांची अंत्‍ययात्रा काढली. ग्रामस्‍थांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ, अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्‍या प्रतीकात्‍मक पुतळ्‍यांची अंत्‍ययात्रा काढली. या यात्रेत गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी काही ग्रामस्‍थांनी या नेत्‍यांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या.

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍यासाठी बीड जिल्‍ह्यातील खेड गावातील ग्रामस्‍थ अन् तरुण यांनी एकत्रित येऊन साखळी उपोषण करण्‍याचा निर्णय घेतला, तसेच सर्व राजकीय पक्षांच्‍या चिन्‍हांचे दहन करून सर्व राजकीय पक्ष आणि त्‍यांचे पुढारी यांचा विरोध करण्‍याचाही निर्णय घेतला आहे.