कळंगुट येथे पबमध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांना लुटले
पोलिसांनी २ संशयितांना कह्यात घेतले
अशा घटना गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – कळंगुट येथे एका पबमध्ये नेत असल्याचे सांगून अहमदनगर, महाराष्ट्र येथील २ पर्यटकांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २७ ऑक्टोबरला ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी कळंगुट येथील पृथ्वी पटोले आणि सोलापूर येथील संतोष चव्हाण या २ संशयितांना कह्यात घेतले आहे. पीडित पर्यटकांच्या मते संबंधित पबमध्ये अनेक पर्यटकांना मारहाण करून त्यांना लुटण्यात आले आहे. पर्यटकांनी सांगितले की, त्यांना संबंधित पबच्या व्यवस्थापनाने ३० सहस्र रुपये ‘गुगल पे’ करण्यास (ऑनलाईन भरण्यास) भाग पाडले.
त्याखेरीज त्यांच्याकडील सर्व रोख रक्कम घेतली. त्यानंतर पबमधील ‘बाउन्सर’नी त्यांच्यावर आक्रमण केले. यानंतर पीडित पर्यटक खिशात पैसे नसल्याने कळंगुट येथून म्हापसापर्यंत चालत आले. पर्यटकांच्या मते, भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाही.