पू. श्रीपाद हर्षेआजोबा यांची रामनाथी, गोवा येथील श्री. दीप संतोष पाटणे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘सनातन संस्थेचे १२७ वे संत पू. श्रीपाद हर्षे हे संतपद प्राप्त करण्यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. (त्यानंतर ११.१०.२०२३ या दिवशी ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित झाले.)
१. पू. श्रीपाद हर्षेआजोबा संत होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे
त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांची अंतर्मनातून साधना चालू असून, ते लवकरच संत होतील’, असे मला जाणवत होते. माझ्यासह अनेक साधकांना ‘ते संत आहेत किंवा ते लवकरच संत होतील’, असे वाटत होते. त्या दिवसानंतर केवळ १२ – १५ दिवसांत ते संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.
२. चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवणे
पू. हर्षेआजोबा आश्रमात आले होते. तेव्हा त्यांना आश्रम दाखवणार्या साधकासह मीही ‘आश्रम कसा दाखवायचा ?’, हे शिकण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवत होते. ते फार निरागस दिसत होते.
३. दुसर्यांचा विचार करणे
आश्रम पहातांना पू. हर्षेआजोबा चाकांच्या आसंदीवर (‘व्हील चेअर’वर) बसले होते. ते खोलीच्या उंबरठ्याजवळ आल्यावर चाकांची आसंदी थोडी उचलावी लागत होती. तेव्हा ते ‘माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय’, असे म्हणत होते.
४. आश्रम परिसरातील मंदिरे पहातांना जाणवलेली सूत्रे
४ अ. मारुतिरायांच्या मूर्तीकडे अत्यंत जिज्ञासेने पहाणे : दुसर्या दिवशी सकाळी मला आजोबांना आश्रमाच्या परिसरातील मारुति, तनोटमाता आणि त्रिनेत्र गणेश यांची मंदिरे दाखवण्याची सेवा मिळाली. मारुतिरायाचे एकदा दर्शन घेतल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मारुतिरायांकडे पाहिले आणि त्याचे दर्शन घेतले. ते परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रमाणे मारुतिरायाकडे जिज्ञासेने पहात होते.
४ आ. ते मारुतीचे दर्शन घेत असतांना मला त्यांच्यामध्ये बालकभाव जाणवला.
५. तीव्र इच्छाशक्ती आणि दांडगा उत्साह
तनोटमाता आणि त्रिनेत्रगणेश यांची मंदिरे पहाण्यासाठी काही पायर्या चढून जावे लागणार होते आणि त्या वेळी ऊनही पुष्कळ होते; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘आजोबा, दोन मंदिरे उंचावर आहेत. तुम्हाला काही पायर्या चढून जाण्यास जमेल का ?’’ तेव्हा ते अगदी उत्साहाने म्हणाले, ‘‘हो हो, का नाही जमणार ? जरा वेळ लागेल एवढेच ! तुम्हाला चालेल ना ? ‘रामनाथीला आलो आणि मंदिरे पहिली नाहीत’, असे व्हायला नको.’’ त्यांचे वय ८९ वर्षे आहे. या स्थितीत त्यांची इच्छाशक्ती आणि उत्साह मला अद़्भुत वाटला.
६. कर्तेपणा देवाला अर्पण करणे
पायर्या चढल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘आजोबा, तुम्ही या वयातही पायर्या चढलात, हे विशेष आहे.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देवाला काही अवघड आहे का ?’’ त्यांनी कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण केला.
७. कृतज्ञताभाव
अ. त्यांचे बोलणे आणि कृती यांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति त्यांच्यातील कृतज्ञताभाव जाणवत होता.
आ. आश्रम पहातांना गुरुदेवांच्या कृपेने निर्माण झालेल्या आश्रमाप्रति त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
८. पू. हर्षेआजोबा यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
अ. त्यांच्या हाताला धरून पायर्या चढतांना मला आनंदाची अनुभूती आली.
आ. त्यांच्या तळहाताचा स्पर्श अगदी मुलायम होता.
इ. त्यांचा सहवास मला हवाहवासा वाटत होता.
पू. आजोबांच्या सान्निध्यात मला त्यांच्यातील कृतज्ञताभाव, बालकभाव, निरागसता, इतरांचा विचार करणे, शरणागती आदी गुण अगदी जवळून अनुभवता आले. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. हर्षेआजोबा यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दीप संतोष पाटणे (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |