अधिवक्ता इचलकरंजीकर आणि अधिवक्ता रुईकर यांच्याकडून साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती अन् फोलपणा न्यायालयात उघड !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर – पंच म्हणून असलेले विक्रीकर निरीक्षक तुषार महामुनी यांना त्यांच्या कार्यालयाने सकाळी ११ वाजता साक्ष देण्यासाठी उपस्थित रहाण्याचे पत्र दिलेले असतांना ते सकाळी ९.४५ वाजताच तेथे का गेले ? या संदर्भातील कोणतेही सयुक्तिक उत्तर त्यांच्याकडे नाही. महामुनी यांना संशयितांची जी छायाचित्रे दाखवण्यात आली, त्या छायाचित्रांवर त्यांची नावे नव्हती, तर त्यांनी त्या संशयितांची नावे कशी ओळखली ? न्यायालयात साक्ष देतांना महामुनी यांनी ‘अपर पोलीस अधीक्षकांनी पंच म्हणून बोलावले’, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रात ‘साहाय्यक पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी यांच्या नावे त्यांना बोलावले आहे’, असा उल्लेख होता. अशा प्रकारे साक्षीदाराने प्रत्यक्षात नोंदवलेली आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांत अनेक विसंगती असून त्यातील फोलपणा ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर अन् अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्यायालयात उघड केला.
कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता हर्षद निंबाळकर आणि अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील एक संशयित विनय पवार यांचे छायाचित्र ज्यांनी ओळखले, त्या प्रसंगी पंच म्हणून काम पहाणारे विक्रीकर निरीक्षक तुषार महामुनी आणि राज्य कर निरीक्षक किरण धर्माधिकारी यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.
अधिवक्ता डी.एम्. लटके यांनीही उलटतपासणी घेतली. याप्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता आदित्य मुद़्गल, अधिवक्त्या स्नेहा इंगळे, अधिवक्त्या अनुप्रिता कोळी उपस्थित होत्या. या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
‘या प्रकरणातील एक संशयित विनय पवार यांचे छायाचित्र ज्यांनी ओळखले, ते शैलेंद्र मोरे हे जेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अन्य एक पंच राज्य कर निरीक्षक किरण धर्माधिकारी यांचीही साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. यात धर्माधिकारी यांनी न्यायालयात साक्ष देतांना छायाचित्रांचे २ ‘अल्बम’ (छायाचित्रे ठेवण्यासाठीचेे पुस्तक) होते, असे सांगितले; परंतु प्रत्यक्षात लेखी पंचनाम्यात एकाच ‘अल्बम’ची नोंद आहे’, हे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याच प्रकरणी साक्ष नोंदवणारे तुषार महामुनी यांना ‘त्यांच्या कार्यालय प्रमुखांनी पंच म्हणून साक्ष देण्यास जाण्यास सांगितले’, असे सांगितले; प्रत्यक्षात त्यांना जे अधिकृत पत्र देण्यात आले, ते ‘स्वीय साहाय्यक विक्रीकर सहआयुक्त’ यांच्या नावाने आहे, तसेच ‘न्यायालयात साक्ष देतांना प्रत्यक्षात झालेल्या पंचनाम्यातील अनेक लिखाण सांगितलेले नाही’, हेही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.