खोजेवाडी (जिल्‍हा सातारा) येथे स्‍थानिक गुन्‍हे शाखेने केलेल्‍या कारवाईत २७ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !

कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक

सातारा, २७ ऑक्‍टोबर (वार्ता.) – आले लागवडीच्‍या शेतात गांज्‍याच्‍या झाडांची लागवड आणि जोपासणा करणार्‍या लहु कुंडलिक घोरपडे यांना स्‍थानिक गुन्‍हे शाखेने कह्यात घेतले. घोरपडे यांच्‍याकडून २७ लाख ३४ सहस्र ५०० रुपयांची गांजाची झाडे शासनाधीन करण्‍यात आली.

स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पोलीस अधिकार्‍यांना मिळालेल्‍या माहितीनुसार त्‍यांनी खोजेवाडी येथील घोरपडे यांच्‍या शेतात धाड घातली. शेतामध्‍ये गांजाच्‍या झाडांची लागवड केल्‍याचे आढळून आले, तसेच गुंगीकारक औषधी द्रव्‍ये आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थही कह्यात घेण्‍यात आले. घोरपडे यांच्‍याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्‍यात गुंगीकारक औषधी द्रव्‍ये आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्‍वये विविध कलमांखाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

सातारा येथील स्‍थानिक गुन्‍हे शाखेला या घटनेची सर्व माहिती मिळाली; मात्र बोरगाव पोलीस ठाण्‍याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना याविषयी माहिती कशी मिळाली नाही ? असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. यामुळे बोरगाव पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवर पुन्‍हा एकदा प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.