सेवेची तळमळ असणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे)!
उद्या २९.१०.२०२३ (आश्विन कृष्ण प्रतिपदा) या दिवशी आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अंजली जोशी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांना ६८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. संशोधक वृत्ती
‘श्री. अजय यांची पूर्वीपासून संशोधक वृत्ती होती. ते ज्या आस्थापनात (कंपनीत) नोकरी करत होते, तेथे ते संशोधन विभागात होते. तेथे ते गाईच्या गर्भाचे प्रत्यारोपण करण्याविषयी संशोधन करत होते. त्यासाठी त्यांनी फ्रान्समध्ये असतांना विविध प्रयोग करून ते यशस्वीही केले होते. आता ते आध्यात्मिक क्षेत्रात साधना करत असतांनाही विविध प्रयोग करून साधकांना सहज सोप्या भाषेत साधना सांगतात किंवा साधकांकडून वेगवेगळे प्रयोग करवून घेऊन त्यांना आनंद देतात. साधकांचे भावाच्या स्तरावर प्रयत्न होऊन त्यांची साधना चांगली व्हावी, यासाठी ते त्यांच्याकडून भावजागृतीचे विविध प्रयोग करवून घेतात.
२. कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे
त्यांना सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून उपायांसाठी नामजप शोधण्याची सेवा मिळते. ते ती शिकून घेतात आणि लगेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करतात. त्यामुळे त्रास असलेल्या साधकांना लगेच साहाय्य होते.
३. सूक्ष्म परीक्षण करण्याची क्षमता असणे
त्यांनी प्रयोगाच्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षण योग्य असते. त्यांनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी शोधलेला नामजप योग्य असल्याने साधकांना त्याचा लगेच लाभ होतो. ते मात्र त्याचे श्रेय देवाला देऊन अखंड कृतज्ञताभावात असतात.
४. सेवेची तळमळ असणे
श्री. अजय यांचे वय ६८ वर्षे असूनही ते अखंड सेवारत असतात. त्यांना वेळ वाया घालवायला आवडत नाही. त्यांच्याकडे सेवा अल्प असेल, तर ते लगेच उत्तरदायी साधकांना सांगून इतर सेवा मागून घेतात आणि त्या करतात. ‘सतत सेवारत राहिल्याने आपले शरीर, मन आणि चित्त देवाच्या कार्यात समर्पित होते अन् नामात एकाग्र होते’, असा त्यांचा भाव असतो.
५. इतरांना साहाय्य करणे
कुणालाही सेवेत काही साहाय्य हवे असल्यास ते तत्परतेने साहाय्य करतात.
६. प्रेमभाव
अ. प्रेमभाव हा त्यांचा स्थायीभाव आहे. पूर्वीपासूनच त्यांना सर्वांवर प्रेम करायला जमते. ते त्यांच्या सर्व नातेवाइकांचे आवडते आहेत, तसेच ते माझ्या माहेरच्या लोकांमध्येही आवडते आहेत. त्यांच्या मनात कुणाविषयी आप-पर भाव नसतो. त्यांचे साधकांवरही निरपेक्ष प्रेम आहे.
आ. त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करतांना ते वेळेची पर्वा करत नाहीत. अर्ध्या रात्री भ्रमणभाष आला आणि ते गाढ झोपेत असले, तरी (त्यांना ‘मायग्रेन’च्या त्रासावर जी गोळी घ्यावी लागते, त्यामुळे पुष्कळ झोप येत असूनही) ते लगेच उठून उपाय शोधून देतात आणि स्वतःही करतात.
इ. साधक आमच्या घरी रहात असतांना ते त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना देत असत.
ई. एकदा रामनाथी आश्रमात एक कबुतर मरणोन्मुख अवस्थेत असतांना श्री. अजय यांच्या मुखातून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा जयघोष झाला आणि त्या कबुतराने त्यांच्या हातातच प्राण सोडला. रामनाथी आश्रमातील खंड्या नावाच्या कुत्र्याच्या मृत्यूसमयीही देवाने त्यांच्या मुखातून नामजप करून घेतला.
७. आसक्ती नसणे
त्यांच्या जवळ असलेल्या वस्तूतील एखादी वस्तू कुणाला आवडली, तर ते ती लगेचच त्याला देतात.
८. लिखाण करायला आवडणे
त्यांना प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायला आवडते. कुणी काही सांगितले, तर ते त्यांच्या जवळील छोट्या छोट्या कागदांवर लगेच लिहून ठेवतात.
९. क्षात्रवृत्ती असणे
त्यांचा पशूवैद्यांचा एक ‘व्हॉट्सअॅप’चा गट आहे. त्यात ‘कुणी देवाविषयी किंवा धर्माविषयी विडंबनात्मक अथवा चुकीची माहिती टाकली आहे’, असे त्यांच्या लक्षात आले, तर ते लगेच तिचे खंडन करतात, उदा. मध्यंतरी गटातील एका सदस्याने ब्राह्मणविरोधी एक लेख लिहिला होता. त्यावर श्री. अजय यांनी ‘आपल्या गटामध्ये सर्व जातीचे सदस्य आहेत. त्यामुळे असल्या पोस्ट टाकू नयेत’, अशी प्रतिक्रिया दिली. त्या पोस्टवर ज्यांनी ‘चांगली’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, त्यांना भ्रमणभाष करून ‘अशा पोस्टला ‘लाईक’ करू नये’, असेही त्यांना सांगितले. (त्यात त्यांचा अमेरिकेतील एक मित्रही होता.)
१०. चुका प्रांजळपणे सांगणे
त्यांच्याकडून दिवसभरात झालेल्या चुका ते प्रांजळपणे माझ्याजवळ सांगतात आणि त्यांना त्यावर योग्य दृष्टीकोन दिल्यास ते लगेच स्वीकारतात.’
– सौ. अंजली जोशी, सनातन आश्रम, मिरज (१८.६.२०२३)