साधकांनो, स्वत:च्या साधनेसाठी सजग राहून ‘कोजागरी पौर्णिमे’च्या निमित्ताने साधनेचा जागर करा !
१. कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व
‘कोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवी महालक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते. सर्वत्र भ्रमण करतांना मध्यरात्री ती ‘को जागर्ति ?’, म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारते.
२. भावार्थ
‘को जागर्ति ?’, याचा अर्थ केवळ ‘शारीरिकदृष्ट्या कोण जागे आहे ?’, असा नाही, तर ‘स्वत:च्या साधनेसंदर्भात कोण सजग आहे ?’, असे देवी विचारत येते. ‘आपण मायेत गुंतून भगवंताला, देवीला विसरतो कि तिच्याप्रती कृतज्ञ रहातो ? आपण स्वभावदोष-अहंकाराच्या जाळ्यामध्ये अडकतो कि भगवंताचे चरण घट्ट धरून रहातो ? स्वत:च्या साधनेसाठी कोण सजग आणि जागृत आहे ?’, हे पहाण्यासाठी साक्षात् देवी महालक्ष्मी भूतलावर अवतरणार आहे.
३. देवी महालक्ष्मी करत असलेली कृपा !
जो स्वत:च्या साधनेसंदर्भात सजग आहे, त्याला ती भरभरून कृपाशीर्वाद देत धन्य धन्य करणार आहे. देवी महालक्ष्मी त्याला भक्ती आणि मुक्ती प्रदान करून त्याच्या जीवनाचा उद्धार करणार आहे.
या कोजागरी पौर्णिमेला आपण साधनेसाठी सजग राहून देवी महालक्ष्मीच्या या अद़्भुत लीलेची अनुभूती घेऊया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२७.१०.२०२३)
हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने होण्यासाठी देवी महालक्ष्मीला आळवूया !‘अखिल ब्रह्मांडाला धन-धान्य आणि राजवैभव याने संपन्न करणार्या ऐश्वर्यशालिनी देवी महालक्ष्मीच्या कृपेनेच देवराज इंद्रालाही स्वर्गातील राजवैभव प्राप्त झाले होते. आता या कलियुगात भूतलावर ‘सनातन धर्म राज्य’रूपी दिव्य राजवैभव अनुभवता येण्यासाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने होण्यासाठी देवी महालक्ष्मीला कळकळीने आळवूया !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२७.१०.२०२३) |