अमेरिकेतील अराजक !
अमेरिकेतील लेविस्टन शहरात ४० वर्षीय रॉबर्ट कार्ड याने अंदाधुंद गोळीबार केला. यात २२ जण ठार झाले, तर शेकडो लोक गंभीर घायाळ झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. रॉबर्ट हा निष्णात नेमबाज म्हणून ओळखला जातो. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही; पण त्याच्याकडे बंदूक असल्याने त्याने आणखी अराजक घडवले, तर भीषण परिस्थिती ओढवू शकते. यामुळे पोलीस त्याच्या शोधात आहेत. गोळीबार करणारा मानसिक रुग्ण असूनही पोलिसांना न सापडणे हे पोलीस प्रशासनाचे अपयश नव्हे का ? ‘रॉबर्ट मध्यंतरी आरोग्य केंद्रात होता’, असे सांगितले जाते. असे होते, तर मग त्याच्या शस्त्रवापरावर निर्बंध का आणले गेले नाहीत ? ‘मानसिक रुग्ण असणार्या व्यक्तीकडे शस्त्रे आली कुठून ?’, याचाही शोध घ्यायला हवा. ‘रॉबर्टसारख्या आणखी किती मानसिक रुग्ण असणार्या व्यक्ती अमेरिकेत शस्त्रे बाळगून वावरत आहेत ?’, याचीही तातडीने चौकशी व्हायला हवी. ‘अँड्रॉस्कोगिन काऊंटी शेरीफ’ कार्यालयाने त्यांच्या फेसबुक खात्यावर संशयिताची २ छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यात तो खांद्यावर शस्त्र घेऊन गोळीबार करतांना दिसत आहे. ‘पोलिसांनी लवकरात लवकर त्याला कह्यात घ्यावे’, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. रॉबर्ट हा अमेरिकेच्या सैन्यदलातील प्रशिक्षण केंद्रात ‘बंदूक प्रशिक्षक’ म्हणून कार्यरत होता. मध्यंतरी त्याला मानसिक आरोग्य केंद्रातही भरती करण्यात आले होते. त्याने सैन्य तळावर गोळीबाराची धमकी दिली होती. ‘एखादा प्रशिक्षित नेमबाज मानसिक रुग्ण का झाला ?’, याचाही विचार अमेरिकेने करावा.
नाण्याची दुसरी अपयशी बाजू !
‘अमेरिका आणि गोळीबार’ हे समीकरण नवीन राहिलेले नाही; कारण तेथे कुठे गोळीबार होत नाही, असे ठिकाण क्वचितच आढळेल. शाळा, खेळाचे पटांगण, उपाहारगृहे (हॉटेल) किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी तेथे सर्रास गोळीबार केला जातो. या वर्षातील ही गोळीबाराची ५६५ वी घटना आहे. वर्षभरात गोळीबाराच्या घटनांमध्ये १५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. हे वाचले, तरी मन सुन्न होते. खरेतर अमेरिका हे सर्वांत बलाढ्य आणि शक्तीशाली राष्ट्र म्हणवले जाते; परंतु तेथील समाजमनाची अशी दुर्दशा होणे, हे राष्ट्राच्या सामर्थ्यासाठी लाजिरवाणेच आहे. अमेरिका प्रगत राष्ट्र असल्याने कोणत्याही संकटांचा सामना करण्याची, तसेच हानी सोसूनही त्यावर मात करण्याची तेथे सिद्धता केलेली आहे. न्यूनतम मनुष्यहानी व्हावी, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न असतात. यामुळे आता नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या थोडी न्यून होत आहे. ही झाली नाण्याची एक बाजू; पण गोळीबारामुळे मृत्यू होणार्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याला आळा कोण घालणार ? प्रगतशील अमेरिकेचे हे अपयशच म्हणावे लागेल.
अमेरिकेच्या राज्यघटनेने स्वसंरक्षण आणि राज्याची सुरक्षा यांसाठी तेथील नागरिकांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार दिला आहे; पण या अधिकाराचा गैरवापर होत आहे, हे गंभीर आणि तितकेच भयावहही आहे. राज्यघटनेचा मूळ उद्देशच बाजूला पडत चालला आहे. जो उठतो, तो हातात बंदूक घेऊन गोळीबार करू लागतो. त्यामुळे या हिंसाचाराला एकप्रकारे साथीचे स्वरूपच प्राप्त होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी राज्यघटनेच्या उद्देशाचे कारण देत विरोधही तितक्याच प्रमाणात केला जात आहे. जोपर्यंत शस्त्र परवाना देण्यावर निर्बंध घातले जात नाहीत किंवा त्याविषयी समाधानकारक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत भांडवलशाही असणार्या अमेरिकेतील बंदूक संस्कृती नष्ट होणार नाही, हेही तितकेच खरे ! शस्त्र परवाना कायदेशीररित्या मिळत असल्याने हिंसाचार घडवून समाजस्वास्थ्य बिघडवले जाते. ‘यावर वचक निर्माण व्हायला हवा’, असे प्रत्येकालाच वाटते; पण पुढे काहीच होत नाही. जो तो राज्यघटनेचे कारण देत हातावर हात ठेवून गप्प बसतो.
अमेरिकेसारख्या विकसित देशाचे अनुकरण आज संपूर्ण विश्वात केले जाते. अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यामुळे अमेरिकेने स्वतःचे दायित्व आणि कर्तव्य यांचे भान जोपासायला हवे. आज अमेरिकेत अस्तित्वात असलेली बंदूक संस्कृती, नव्हे विकृती उद्या विश्वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ? तसे झाल्यास संपूर्ण विश्वात हाहाःकार माजेल. मग त्यावर नियंत्रण आणणे किती अवघड होईल, याचा विचार अमेरिकेने करावा.
सर्वच क्षेत्रांत प्रगतीचे पाऊल उचलले गेल्याने अमेरिका हे राष्ट्र श्रीमंत आणि सुरक्षित म्हणून ओळखले जात होते; पण याला बंदूक संस्कृतीने गालबोट लावले आहे. हीच अमेरिका आता दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागली आहे. ‘ती पुन्हा कधी सुरक्षित होईल ?’, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. सुरक्षेसाठी शस्त्रवापरावर निर्बंध आणणे हाच एकमेव उपाय आहे; पण त्याचा अवलंब होणे कठीण आहे. अमेरिकेत शस्त्रवापराला विरोध करणारे अल्प आणि त्याचे समर्थन करणारे अधिक असे प्रमाण आहे. शस्त्रवापराला विरोध करणार्यांनाच शस्त्राची शिकार व्हावी लागते, इतकी भयावह परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे; मात्र तरीही प्रत्येक जण मूग गिळून गप्प आहे. या सगळ्यामुळे अमेरिकेची संपूर्ण विश्वात अपरिमित मानहानी होत आहे. बंदूक संस्कृतीचा राष्ट्रविघातक परिणाम लक्षात घेता आतातरी अमेरिकेने तिच्या हिंसक संस्कृतीवर निर्बंध आणायला हवेत. सुरक्षिततेच्या बळावर अवघ्या राष्ट्राचा डोलारा अवलंबून असतो खरा; पण अमेरिकेतील या पायालाच तडे गेल्याने खर्या अर्थाने राष्ट्रउभारणी होऊ शकेल का ? अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या समस्येचा सखोल विचार करून तातडीने मार्ग काढायला हवा !
अमेरिकेसारख्या प्रगत देशात फोफावलेल्या बंदूक विकृतीविषयी पाश्चात्त्यांचे उदात्तीकरण करणारे बोलत नाहीत ! |