घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडचा रत्नदुर्गावर समारोप
रत्नागिरी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमी (दसरा) या कालावधीत घेण्यात आलेल्या ‘श्री दुर्गामाता दौड’चा रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा रत्नदुर्गावर समारोप करण्यात आला. विजयादशमीला ही दौड, मारुति मंदिर, जयस्तंभ, मांडवी नाका, राममंदिर, भागेश्वर मंदिर, पेठ किल्ला, श्री भगवतीदेवी मंदिर, रत्नदुर्ग किल्ला या मार्गे घेण्यात आली. रत्नदुर्गावरील श्री भगवतीदेवीच्या मंदिरात दौड नेण्यात आली. रत्नदुर्गाला प्रदक्षिणा घालून देवीची सामूहिक आरती करण्यात आली. या ध्वजाचे नेतृत्व श्री. अक्षत सावंत यांनी केले, तसेच समारोपास उपस्थित प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. गजानन करमरकर यांनी दौडीत सहभागी व्यक्तींना हिंदूंवर होणारी आक्रमणे, राष्ट्रावर आतंकवादाचे येणारे संकट आणि यासाठी हिंदूंचे संघटन किती महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
प्रत्येक हिंदुच्या मनात देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती जागृत व्हावी आणि हिंदूंचे संघटन अधिकाधिक बळकट व्हावे, यासाठी रत्नागिरीकरांनी श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद दिलात. आपली हीच मोलाची साथ सदैव राहो आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या पुढील अनेक उपक्रमांत (शिवराज्याभिषेक सोहळा, तिथीनुसार शिवजयंती, धर्मवीर बलीदान मास, गडकोट मोहीम, शिवछत्रपतींची नित्यपूजा) आपण असेच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. राकेश नलावडे यांनी केले.