पावस (रत्नागिरी) येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, २७ ऑक्टोबर (वार्ता.)- तालुक्यातील पावस येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम दसर्‍याच्या दिवशी झाला. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना प्रज्वलित होण्याकरता सामूहिक शस्त्रपूजन ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमाचा उद्देश सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी म्हणाले की, विजयादशमीचा दिवस अर्थात् दसरा म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय मिळाल्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराचा, प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्म संपवला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले होते; म्हणून या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विजयादशमीच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होण्याकरता सामूहिक शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सामूहिक शस्त्रपूजन

यानंतर श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री. चंद्रहास विलणकर आणि श्री. वैभव देशमुख यांच्या हस्ते शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. सदानंद देसाई यांनी मंत्रपठण केले. त्यानंतर श्री दुर्गादेवीची सामूहिक आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित हिंदु बंधू-भगिनींनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेचे उच्चारण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश लाड यांनी केले.

या कार्यक्रमाला श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दादा देशमुख, तसेच सर्वश्री संतोष सामंत, सुभाष पावसकर यांसह सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाला देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ यांसह हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विजय गुरव, नामदेव गुळेकर, संजय मेस्त्री आदी उपस्थित होते.