पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना अभिवादन !
सातारा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावतांना धारातिर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह पोलीसदलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
१ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कर्तव्यावर असतांना हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नावांचे वाचन करण्यात आले, तसेच या वेळी संपूर्ण पोलीसदलाने उभे राहून मानवंदना दिली. या वेळी पोलीस दलाने बंदुकीच्या ३ फैरी झाडून आणि पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली. पोलीसदलातील उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.