Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

भारत झाला सतर्क !

नवी देहली – सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात चीनची पाणबुडी आणि युद्धपोत पाकसमवेत संभाव्य युद्धाभ्यास करण्यासाठी हिंद महासागरातून त्याच्या दिशेने जात आहेत, अशी माहिती भारतीय नौदलाला मिळाली आहे. नौदल ‘पी-८ आई’ पहारा विमाने आणि ‘एम्.क्यू.-९बी’ ड्रोन यांच्या साहाय्याने चीनच्या कारवायांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. हिंद महासागर क्षेत्राला भारताचे दायित्व असलेले क्षेत्र म्हणून पाहिले जाते.

हिंद महासागरातील सूत्रांच्या हवाल्याने ‘ए.एन्.आय.’ वृत्तसंस्थेने सांगितले की, चिनी नौदल तीन युद्धपोत आणि एक टँकर यांच्यासह फारसच्या खाडी क्षेत्रात आहे. समुद्री अभ्यासासाठी पाकिस्तानी नौदल यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हा युद्धाभ्यास नोव्हेंबर मासाच्या मध्यात अथवा शेवटी केला जाऊ शकतो. चीन आणि पाक यांना येथून अमेरिकी नौदलाच्या कारवायांकडे लक्ष ठेवायचे आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष चालू झाल्यापासून अमेरिकी नौदलाची या क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !