महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढ !
वातावरणातील बदलाचा परिणाम !
पुणे – वातावरणातील पालटांमुळे यंदा राज्यात सर्दी, ताप, खोकला या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले असतांनाच आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूच्या ६ सहस्र ४४८ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत १२ सहस्र ४५५ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
Dengue Fever: नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज : १ हजार ७४२ व्यक्तींची झाली टेस्ट.#DengueFever #DengueInWardha #Dengue #Maharashtra #VidarbhaTimeshttps://t.co/5lsTfglW0p
— Vidarbha Times (@VidarbhaaTimes) October 23, 2023
राज्यात यंदा थांबून पडलेला पाऊस आणि तापमानातील पालट यांमुळे डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे, असे राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.
राज्यात गेल्या वर्षी डेंग्यूमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाणसुद्धा अल्प आहे. यामुळे डेंग्यूच्या विषाणूमध्ये काही पालट झाला आहे का ? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. – डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्यरोग तज्ञ, आरोग्य विभाग |