शिकण्याची वृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणे, अशा अनेक दैवी गुणांनी युक्त असून सतत कृतज्ञताभावात असणारे देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !
‘२७.१०.२०२३ (आश्विन शुक्ल चतुर्दशी) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा ७७ वा वाढदिवस आहे. ‘देवद (आश्रमातील नवीन इमारतीचे बांधकाम चालू झाल्यापासून (फेब्रुवारी २०२३ पासून) पू. शिवाजी वटकरकाका यांची निवासव्यवस्था माझ्या खोलीत आहे. त्यामुळे काही मासांपासून मला पू. वटकरकाका यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पू. काकांविषयी जाणवलेली सूत्रे येथेे दिली आहेत.
पू. शिवाजी वटकर यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. शिवाजी वटकर यांच्याविषयी काढलेले कौतुकोद़्गार !‘जसे वय वाढत जाईल, तशी सर्वसाधारण वयस्कर व्यक्ती तिच्यातील आत्मकेंद्रितपणामुळे सर्वांना नकोशी होते; परंतु पू. शिवाजी वटकर यांचे वयाच्या ७७ वर्षीचे वागणे तरुणांना लाजवणारे आहे. आदर्श दिनचर्या, सतत इतरांचा विचार करणे, इतरांना साहाय्य करणे, सर्वांशी जवळीक साधणे या गुणांमुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! सतत कृतज्ञताभावात असल्याने त्यांनी ईश्वराशीही जवळीक साधली आहे. अशा पू. शिवाजी वटकर यांची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मला अनेक वर्षे लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१०.२०२३) |
१. पू. वटकरकाका यांची सकाळच्या कालावधीतील दिनचर्या
अ. ‘पू. वटकरकाका पहाटे ३ च्या सुमारास उठतात. उठण्यासाठी त्यांना केव्हाही गजर लावावा लागत नाही. त्यांना स्वतःहून जाग येते.
आ. स्वतःचे आवरल्यावर ते नामजप करतात किंवा पहाटे संकलनासाठी आलेल्या धारिकांचे संकलन करतात. थोड्या वेळाने योगासने करून ते अर्धा घंटा चालण्याचा व्यायाम करतात.
इ. त्यानंतर स्नान करून प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसून समष्टीसाठी त्यांना करण्यास सांगितलेले काही मंत्रजप करतात.
२. इतरांचा विचार करणे
अ. पू. काका उठतात, तेव्हा मी झोपलेला असतो; म्हणून ते त्यांचे वैयक्तिक आवरण्यासाठी खोलीतील प्रसाधनगृहाचा वापर न करता ते सामायिक प्रसाधनगृहात जातात.
आ. पू. काका खोलीत लहान दिवा लावून आवश्यक ते आवरून संकलनाची सेवा करतात. हे सर्व करतांना माझ्या दिशेने अधिक उजेड येऊन ‘माझ्या झोपेत व्यत्यय येऊ नये’, यासाठी ते कपाटाचे एक दार उघडे ठेवतात.
३. पू. काकांचे वय ७७ वर्षे असूनही ते कोणत्याही गोष्टीत सवलत घेत नाहीत.
४. इतरांना साहाय्य करणे
अ. पू. काका प्रतिदिन पहाटे अंघोळ करतात आणि उदबत्ती लावतात अन् मी गळ्यात घालत असलेल्या माळांची शुद्धी करून ठेवतात.
आ. मी कधी फळे खाण्यासाठी ती कापू लागलो की, लगेच ते ‘‘मी कापून देऊ का ?’’, असे मला विचारतात.
इ. बर्याच वेळा अकस्मात् समष्टीसाठी नामजपादी उपाय करण्याचा निरोप येतो. तेव्हा त्यांनी मला सांगून ठेवले आहे, ‘‘तुम्ही मला केव्हाही नामजपादी उपाय करण्यास सांगू शकता. तुम्हाला काही साहाय्य लागल्यास सांगा.’’
ई. खोलीत वाळत घातलेले स्वतःचे कपडे दोरीवरून काढतांना मी व्यस्त असल्यास ते माझेही कपडे दोरीवरून काढतात आणि लगेच घडी घालून ठेवतात.
उ. मला अन्य संतांना काही निरोप द्यायचा असल्यास ते म्हणतात, ‘‘मला सांगत जा. मी देईन.’’
५. शिकण्याची वृत्ती
अ. देवद आश्रमात असलेल्या दैवी बालकांकडून त्यांना जे शिकायला मिळते, त्याविषयी ते मला अधूनमधून सांगतात.
आ. ‘कोणत्याही नकारात्मक वाटलेल्या प्रसंगातून काय शिकायला मिळते’, हे ते योग्यपणे सांगतात.
इ. माझ्याकडे कपाटात कपडे ठेवण्यासाठी सुबक आकाराचे ‘शर्ट पाऊच’ आहेत. त्यात शर्ट व्यवस्थित रहातात. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीही लगेच तशा प्रकारचे ‘शर्ट पाऊच’ आणून स्वतःच्या कपाटातील कपडे व्यवस्थित आवरून ठेवले.
ई. संत सत्संगात विविध विषय होतात. अनेक प्रकारचे दृष्टीकोन शिकायला मिळतात. त्याविषयी ते सतत म्हणतात, ‘‘या सत्संगातून मला बरेच शिकायला मिळते.’’
६. प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभ्यासपूर्ण वाचन करणे
पू. काका प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभ्यासपूर्ण वाचन करतात. त्यातील लेखांचा मथळा, वाक्यरचना किंवा व्याकरण यांतील त्रुटी काढून त्या लिखित स्वरूपात देवद आश्रमातील दैनिकाशी संबंधित सेवा करणार्या साधकांना सांगतात.
७. सेवेची तळमळ
पू. काकांना पाठीच्या दुखण्यामुळे सलग बसता येत नाही, तरीही ते दिवसभरात वेळ वाया न घालवता मधेमधे संगणकासमोर बसून धारिकांचे संकलन करणे, काही वेळ झोपून व्यष्टी आणि समष्टीसाठी नामजप करणे इत्यादी सेवा करतात. त्यांच्या या कृतीमध्ये सातत्य असते. त्यांच्यात ‘तळमळ’ हा गुण पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे.
८. परिपूर्ण सेवा करणे
पूर्वी ते करत असलेली ‘हेल्पलाइन’ची सेवा आता अन्य साधक पहातात; परंतु त्यांचा पूर्वीचा भ्रमणभाष क्रमांक जुन्या जिज्ञासूंकडे असल्याने अजूनही त्यांना त्याविषयी केव्हाही, म्हणजे अगदी रात्री झोपल्यावरही भ्रमणभाषवर संपर्क येतात. त्या प्रत्येक वेळी ते तेवढ्याच शांतपणे भ्रमणभाषवर समोरच्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. त्या संपर्कातील सूत्रे ते लगेच संबंधित साधकाला पाठवून पुढील संपर्क करण्यास सांगतात. यातून त्यांचे ‘परिपूर्ण सेवा करणे आणि तत्परता’ हे गुण लक्षात येतात.
९. साधकांना प्रेरणा मिळावी; म्हणून प्रतिदिन योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ग्रंथातून त्यांची प्रेरणादायी सुवचने शोधून, त्याची संरचना करून साधकांना ‘व्हॉटस्अॅप’द्वारे पाठवणे
पू. काका प्रतिदिन योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या ग्रंथातून त्यांची प्रेरणादायी सुवचने शोधतात. त्याची संरचना करतात आणि ‘साधकांना प्रेरणा मिळावी’, यासाठी प्रतिदिन पहाटे त्यांना ‘व्हॉटस्अॅप’द्वारे पाठवतात. ही सुवचने पुष्कळ प्रेरणादायी असल्याने बरेच साधक ती व्हॉटस्अॅपवर ‘स्टेटस’ म्हणून ठेवतात.
१०. ‘पोट बिघडून सेवेत खंड पडू नये’, यासाठी संयमाने खाणे
त्यांचे खाणे-पिणे अगदी साधे आहे. आश्रमात सर्वांसाठी जो प्रसाद किंवा महाप्रसाद असतो, तोच ते घेतात. त्यात कोणताही स्वादिष्ट किंवा थोडा वेगळा पदार्थ असला, तरीही ते भाकरी आणि भाजी हाच महाप्रसाद ग्रहण करतात. ‘‘या वयात स्वतःच्या पोटाची काळजी घ्यायला हवी. ‘पोट बिघडून सेवांवर परिणाम झाला’, असे व्हायला नको. सेवा करता आली पाहिजे’, असे ते म्हणतात.
११. मित्र प्रेम
पू. काका आणि श्री. तुकाराम (बापू) लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६३ वर्षे) यांची मैत्री सर्वश्रुत आहे.
अ. पू. काका बापूंना त्यांच्या लक्षात आलेल्या चुका साहाय्य म्हणून व्यवस्थित समजावून सांगतात. बापूंनी ‘साधनेत लवकर पुढे जाण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजेत’, याविषयी ते त्यांना प्रेमाने सांगतात. यात ते त्यांच्या आढावासेवकांचेही साहाय्य घेतात.
आ. बापू आश्रमात असल्यास पू. काका प्रतिदिन त्यांना दुपारच्या न्याहारीच्या (प्रसादाच्या) वेळेत खोलीत बोलावून त्यांना प्रेमाने त्यांच्याकडील फळे किंवा सुका खाऊ खायला देतात. दोघे एकमेकांना भ्रमणभाष करून जेवणाची वेळ ठरवून जेवणाच्या वेळी एकत्र भेटतात.
१२. प्रसाद आणि महाप्रसादासाठी प्रतिदिन वेगवेगळ्या जागेवर बसणे
‘साधकांशी जवळीक व्हावी आणि त्यांच्याशी साधनेविषयी बोलता यावे’, यासाठी प्रतिदिन ते प्रसाद अन् महाप्रसाद घेण्यासाठी वेगवेगळ्या साधकांच्या समवेत बसतात.
१३. कृतज्ञताभाव
अ. पू. काका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी सतत कृतज्ञ असतात. ते म्हणतात, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्यासारख्या जिवाला आश्रमात ठेवले आहे आणि माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. साधकांसाठी आश्रमात पुष्कळ सोयी – सवलती दिल्या आहेत. येथे कशाचीच उणीव भासू दिली नाही. घरी असतो, तर माझ्याकडून एवढी साधना झाली नसती.’’
आ. ते म्हणतात, ‘‘मनात साधनेविषयी कोणतेही प्रश्न आल्यास सनातन संस्थेमध्ये त्याचे लगेच मार्गदर्शन मिळते. केवढी ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !’’
इ. संतांच्या खोलीत रहात असल्याने प्रतिदिन त्यांना संतांचा सत्संग लाभतो. यासाठी ते कृतज्ञता व्यक्त करतात.
१४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. शिवाजी वटकर यांच्याविषयी काढलेले गौरवोद़्गार !
एप्रिल २०२३ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देवद आश्रमात आल्या होत्या. तेव्हा त्या पू. काकांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये लिहून देत असलेले लेख फार छान असतात.’’ तेथे उपस्थित असलेले सद़्गुरु, संत आणि साधक यांना म्हणाल्या, ‘‘पू. वटकरकाका सतत भावाच्या स्थितीत असतात.’’
१५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, ‘आम्हाला अनेक संतांकडून शिकता यावे’, यासाठी ‘एकत्रित रहाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीत’, याविषयी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! आपल्याला अपेक्षित असे प्रत्येक संतांकडून मला शिकता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे. आपण सुचवलेली शब्दसुमने आपल्या चरणी अर्पण !
‘इदं न मम ।’ म्हणजे ‘हे लिखाण माझे नाही.’
– सद़्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.५.२०२३)