Indian Students in Canada: शुल्कात भारतीय विद्यार्थ्यांचे ७२ टक्क्यांपर्यंत योगदान !
कॅनेडातील महाविद्यालयांमध्ये ८० टक्के विद्यार्थी भारतीय !
नवी देहली – भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या संबंधांमुळे तेथे शिकायला जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खरेतर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. याचे कारण असे की, तेथील अनेक मोठ्या महाविद्यालयांतील ७० ते ८० टक्के विद्यार्थी भारतीय असून महाविद्यालयांच्या वार्षिक शुल्कामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या शुल्काचे योगदान ५५ ते ७२ टक्के आहे. ‘या महाविद्यालयांनी भारतीय विद्यार्थ्यांना एका सत्रात प्रवेश दिला नाही, तर ही महाविद्यालये त्या सत्राचा खर्च भागवू शकणार नाहीत’, असे जाणकारांचे मत आहे.
१. अशा महाविद्यालयांपैकी एक असलेल्या ‘नॉर्दर्न कॉलेज’मध्ये ४ सहस्रांहून अधिक विद्यार्थी असून त्यांपैकी केवळ ८३३ कॅनेडियन विद्यार्थी आहेत, तर ३ सहस्र ३५३ विद्यार्थी भारतीय आहेत.
२. अन्यही प्रमुख महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा तब्बल ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यांचा आकडा प्रतिवर्षी वाढत आहे.
३. ‘कॅनेडियन इमिग्रेशन’संबंधी प्रकरणांवर लक्ष ठेवणारे गगन कंवल म्हणाले की, यंदा कॅनडाच्या महाविद्यालयांमध्ये अधिक भीती आहे. ‘भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ कोणत्याही प्रकारे रोखण्यात येऊ नये’, यासाठी त्यांचा कॅनडा सरकारवर दबाव आहे.
४. भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना कॅनडाचे ‘इमिग्रेशन मंत्री’ मार्क मिलर तेथील संसदेत म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आमच्यासाठी आकर्षक मालमत्ता असून आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू शकत नाही.
५. भारतातून प्रतिवर्षी तब्बल २ लाख विद्यार्थी कॅनडात शिकायला जातात. कॅनडाला त्यांचे शुल्क म्हणून अनुमाने ७५ सहस्र कोटी रुपये मिळतात.
६. कॅनेडियन नागरिकत्व असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अत्यल्प शुल्क आकारले जाते आणि त्यातील बहुतेक शुल्क तेथील सरकारद्वारे अनुदानित केलेले असते. त्यामुळे महाविद्यालयांचा खर्च बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांच्या शुल्कातून भागवला जातो.
कॅनडाच्या आर्थिक नाड्याही भारतियांच्या हाती !कॅनडाच्या आर्थिक नाड्या भारतीय व्यावसायिकांच्या हाती असल्या, तरी या व्यावसायिकांची राष्ट्राप्रती किती निष्ठा आहे ?, हेसुद्धा पडताळून पहायला हवे ! युद्धप्रसंगी इस्रायली लोक कोणत्याही देशात असले, तरी मायदेशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सिद्ध असतात. अशी मानसिकता किती भारतियांमध्ये आहे ? १. अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर ‘टोरंटो-वॉटरलू आयटी कॉरिडोर’ विकसित करणे, हा कॅनडाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे केवळ भारतीय व्यावसायिकांच्या बळावर उभारले जात आहे. २. कॅनडातील प्रवासी लोकांमध्ये मालमत्तेत सर्वाधिक गुंतवणूक करणार्यांमध्ये भारतीय अग्रक्रमावर आहेत. चीन दुसर्या क्रमांकावर आहे. व्हँकूव्हर, ग्रेटर टोरंटो, ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा, ब्रिटीश कोलंबिया आणि ओंटारियो येथे भारतीय प्रतिवर्षी ५० सहस्र कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करतात. ३. लहान व्यवसायांचा विचार करता भारतियांनी किराणा दुकान, रेस्टॉरंट आणि अन्य सेवांमध्ये ७० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. ४. अनेक भारतीय आस्थापनांनी मे २०२३ पर्यंत कॅनडामध्ये ४१ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून १७ सहस्र नोकर्या निर्माण केल्या आहेत. |