Qatar Death Sentence : भारतीय परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर बाजूंचा करत आहे अभ्यास !
कतारमध्ये ८ भारतियांना हेरगिरीवरून फाशीची शिक्षा !
दोहा (कतार) – कतारमधील अल् दाहरा आस्थापनातील ८ भारतीय कर्मचार्यांना स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे भारतीय कर्मचारी भारताच्या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. (सर्व निवृत्त) कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश अशी त्यांची नावे आहेत. या शिक्षेविषयी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही या भारतियांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर पथक यांच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यांयाचा शोध घेत आहोत. आम्ही या प्रकरणात सर्व कायदेशीर साहाय्य देत राहू.
सौजन्य : झी न्यूज
शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता. याच प्रकरणात एका खासगी संरक्षण आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कतारच्या आंतरराष्ट्रीय सैन्य कारवाईच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली होती.