Israel Surgical Strike in Gaza : इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !
इस्रायलच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे नेतान्याहू यांचे विधान!
(सर्जिकल स्ट्राईक म्हणजे लक्ष्यित आक्रमण)
तेल अविव (इस्रायल) – २५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, ही आमच्या अस्तित्वाची लढाई असून आम्हाला हे युद्ध जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. हमासला नेस्तनाबूत करण्यासह ओलीस असलेल्यांना सोडवण्यासाठी कठोर कारवाई करू. ७ ऑक्टोबर हा आमच्यासाठी काळा दिवस आहे.
युद्धातील अन्य महत्त्वपूर्ण घडामोडी !
१. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलच्या गाझावरील आक्रमणासाठी अमेरिकेला उत्तरदायी धरले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलच्या आक्रमणांमागे अमेरिकेचा हात आहे. अमेरिकाच या आक्रमणांचे संचालन करत आहे.
२. अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी नेतान्याहू यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. दोघांनी ओलीस ठेवण्यात आलेल्यांना प्राधान्याने सोडवण्याविषयी चर्चा झाली. यासह बायडेन यांनी नेतान्याहू यांच्याशी युद्धामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा मार्ग शोधण्याविषयीही चर्चा केली, अशी माहिती अमेरिकेने दिली.