ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
मुंबई – ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उपाख्य ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालेे. ते नवी मुंबईतील नेरूळ येथे वास्तव्यास होते. २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ वाजता नेरूळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात २ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी मासात त्यांच्या पत्नी ह.भ.प. रुक्मिणी उपाख्य माई यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले.
वारकरी संप्रदायातील प्रमुख ‘कीर्तनकार फड’ म्हणून ‘सातारकर घराण्या’च्या फडाचे नाव मानाने घेतले जाते. गेल्या ४ पिढ्यांपासून त्यांच्या घरामध्ये प्रवचन आणि कीर्तन यांची परंपरा चालू आहे. आता. त्यांच्या कन्या ह.भ.प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत. वर्ष १९६२ मध्ये आप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन आणि प्रवचनाची परंपरा बाबा महाराज यांनी पुढे चालू ठेवली होती. बाबा महाराजांनी अनुमाने १५ लाख व्यक्तींना वारकरी संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. वर्ष १९८३ मध्ये त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थे’ची स्थापना केली. या संस्थेकडून ६० ते ७० सहस्र भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधे पुरवण्यात येतात.