भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची काहींची मागणी, तर काहींचा विरोध !
‘एन्.सी.ई.आर्.टी.’नव्या पुस्तकांसाठी राज्यांनी पाठवल्या विविध सूचना
नवी देहली – ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने तिची नवी पुस्तके बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे गट बनवले आहेत. यावर देशातील राज्यांनी भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची सूचना करतांना काही उदाहरणे दिली आहेत. त्याच वेळी काही राज्यांनी भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण देण्याला विरोध केला आहे.
‘अणू’ची माहिती महर्षि कणाद यांनी सर्वप्रथम दिली !
नवी पुस्तके बनवण्यासाठीच्या वेगवेगळ्या विषयांच्या गटात ‘भारताचे ज्ञान’ हा एक आहे. या विषयांच्या संदर्भात राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. यात उत्तरप्रदेश, हरियाणा आणि झारखंड या राज्यांनी पाठवलेल्या सूचनेमध्ये इंग्रज रसायनशास्त्रज्ञ जॉन डॉल्टन हे ‘अणुसिद्धांताचे जनक’ असल्याचे शिकवण्यात येऊ नये, तर त्यांच्याही अनेक शतकांपूर्वी महर्षि कणाद यांनी पदार्थाचा सर्वांत लहान अविभाज्य कण ‘अणू’ याची माहिती दिली होती’, असे म्हटले आहे. महर्षि कणाद यांनीच अणू आणि त्याचे संयुग स्वरूप, गती अन् रासायनिक प्रक्रिया यांची व्याख्या केली होती. महर्षि कणाद यांनी न्यूटनच्या आधीच वैशेषिक सूत्र बनवले होते. त्यात गती नियम यांचा उल्लेख आहे.
देशातील विविध राज्ये आणि त्यांनी केलेल्या सूचना अन्
विमान राइट ब्रदर्स यांनी नव्हे, महर्षि भारद्वाज यांनी बनवले ! – उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेश राज्याने राइट ब्रदर्सच्या सहस्रो वर्षांपूर्वी ख्रिस्ताब्द पूर्व चौथ्या शतकात महर्षि भारद्वाज यांनी विमानशास्त्र लिहिले होते. यामध्ये प्रत्येक प्रकारचे विमान आरि वायुअस्त्र यांचा उल्लेख आहे. स्कंद पुराणातही लिहिले आहे की, कर्दम ऋषींनी पत्नीसाठी कुठेही ये-जा करणारे विमान बनवले होते.
वेदिक गणिताची समीकरणे अभ्यासक्रमात जोडा ! – गुजरात
गुजरातकडून आलेल्या सूचनेमध्ये ‘ज्योतिष आणि खगोलशास्त्रज्ञ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्योतिषीय गणनेवर आधारित सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची भविष्यवाणी वर्तवली जाते. त्यामुळे वेदिक गणिताची समीकरणे अभ्यासक्रमात जोडण्यात यावीत’, असे म्हटले आहे. याखेरीज भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याच्याकडे दारूगोळा असलेले रॉकेट होते. पाचव्या शतकात वराहमिहिरने भूकंपाची भविष्यवाणी केली होती, अशी माहितीही या सूचनेत दिली आहे.
हरियाणा : मुलांना असे विषय शिकवा जे भूतकाळातील चुकांचे (मोगल आणि इंग्रज यांची आक्रमणे) विश्लेषण करत धडा घेण्यास साहाय्य करतील.
मध्यप्रदेश : उपनिषदे, गीता, महाभारत आणि रामायण यांचा सार इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिकवा.
छत्तीसगड : रामायणातील सीतामातेचा अवतार आणि हनुमानाने हिमालयातून संजीवनी आणणे, यांचा अभ्यासक्रमात समावेश करा.
नागालँड : गुरुकुल व्यवस्था समाविष्ट करू नका; कारण यामध्ये मुलींना प्रवेश मिळत नव्हता. (नागालँड हे ख्रिस्तीबहुल राज्य असल्याने त्याच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार ! – संपादक)
आंध्रप्रदेश : भारतियत्वाच्या नावाखाली अंधश्रद्धा जोडू नका. (श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतीला भेद ठाऊक असणारे अशा प्रकारचे मत कधीही मांडणार नाहीत ! – संपादक)
कर्नाटकातील पूर्वीच्या भाजप सरकारची सूचना काँग्रेस सरकार मागे घेणार !
कर्नाटकच्या पूर्वीच्या भाजप सरकारने मलबार (केरळ) आणि काश्मिरी हिंदू यांच्या नरसंहाराची माहिती देण्याची सूचना केली होती; मात्र आता राज्यात नव्याने आलेल्या काँग्रेस सरकारकडून ही सूचना मागे घेण्यात येणार आहे. (याचा अर्थ काँग्रेसला हिंदूंच्या नरसंहराविषयी काहीही देणेघेणे नाही, हे काँग्रेस निवडून देणार्या कर्नाटकातील हिंद ू जाणतील का ? – संपादक)