जाणीवपूर्वक द्वेष पसरवणारे वक्तव्य करणार्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
सातारा, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा, जितेंद्र आव्हाड, निखिल वागळे यांनी सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण आणि अयोग्य वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशातील १०० कोटी सनातन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सनातन धर्माची तुलना रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे समाजात विद्वेष निर्माण करणार्या अशा व्यक्तींच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. कराड येथील अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे उपस्थित होते.
या वेळी श्री. सुनील घनवट म्हणाले की, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ चालू केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे आम्ही संपूर्ण भारतातील पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट करणार आहोत. आमची पोलीस आणि प्रशासन यांना विनंती आहे की, २८ एप्रिल २०२३ या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार समाजात द्वेष पसरवण्याचे वक्तव्य जो कुणी करेल, त्याच्या विराेधात तक्रार प्रविष्ट करण्याची वाट न पहाता सरकारने स्वत: नोंद घेऊन गुन्हा नोंद करावा.