कराड (जिल्हा सातारा) येथील मुजावर कॉलनीत स्फोट !
९ घायाळ, ७ घरे, ६ दुचाकी यांची हानी
कराड, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण घायाळ झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूच्या ७ घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घरे धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे ६ दुचाकी गाडींचीही हानी झाली आहे. या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटुंबासह रहातात. २५ ऑक्टोबरला सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटुंबियांना घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटुंबातील ५ जण घायाळ झाले आहेत. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की, संपूर्ण मुजावर कॉलनीचा परिसर हादरून गेला, तसेच परिसरातील साईनाथ डवरी, धोंडीराम शेलार, अशोक दिनकर पवार आणि मोहसीन मुल्ला यांच्या घरांची मोठी हानी झाली आहे. या घरातील लोकसुद्धा घायाळ झाले आहेत. अग्नीशमनदलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. घायाळ झालेल्या रुग्णांना कृष्णा रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात असले, तरी हा भीषण स्फोट आणि झालेली हानी पहाता या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे. नेमका स्फोट कसा ? आणि कशामुळे झाला ? याची माहिती कराड पोलीस घेत आहेत.