विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !
सध्या भारतात ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळा’ने (‘आयसीसी’ने) आयोजित केलेली ‘विश्वचषक क्रिकेट’ स्पर्धा चालू आहे. स्पर्धेत सहभागी १० संघांपैकी पाकिस्तान संघाचे खेळाडूही भारतात आले आहेत. पाक संघाला भारतातील मुसलमानांकडून मिळणारा पाठिंबा, पाकिस्तानच्या सामन्याच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या दिल्या जाणार्या घोषणा, पाक खेळाडू महंमद रिझवान याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या शतकानंतर ते शतक इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामध्ये गाझा पट्टीतील इस्रायलविरुद्ध लढणार्या लोकांना (आतंकवाद्यांना) समर्पित करण्याचे केलेले विधान, या पार्श्वभूमीवर भारताचे खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (‘बीसीसीआय’), आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (‘आयसीसी’) यांची भूमिका कशी असावी, यावर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख !
२५ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पाक संघाला भारतीय मुसलमानांचा पाठिंबा, पाक खेळाडूची आतंकवादप्रेमी मानसिकता, ‘आयसीसी’चा दुटप्पीपणा आणि हिंदुद्वेष, भारत-पाक क्रिकेट सामने म्हणजे जणू मैदानावरील युद्धच, तसेच पाक खेळाडूंची रानटी प्रवृत्ती अन् पराकोटीचा भारतद्वेष अन् हिंदुद्वेष’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/731586.html
५. भारताने पाकशी क्रिकेट खेळणे बंद करावे !
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यावरील बंदीनंतर भारत-पाक द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले जात नाही; परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन भारतात होते, तेव्हा त्यात पाकचाही सहभाग असल्याने पाक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बहुतांश लोक पाकमधून भारतात येतात. इतकेच काय, तर शेजारी देश बांगलादेशमधूनही या कालावधीत बरेच लोक भारतात येतात. यांपैकी किती लोक स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा मायदेशी जातात ? हा मोठा प्रश्नच आहे ! देशात पाक आणि बांगलादेश येथून मुसलमानांकडून भारतात शिरणार्या घुसखोरांची संख्या पुष्कळ आहे. क्रिकेट सामन्याचे कारण देऊन भारतात घुसखोरांच्या माध्यमातून आतंकवादीही घुसू शकतात. वर्ष २०११ मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पाकमधून आलेल्या एकूण लोकांपैकी केवळ ५० टक्केच लोक मायदेशी गेले होते. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी पाकमधून आलेल्यांपैकी सगळे लोक पुन्हा मायदेशी गेल्याची शाश्वती सरकार देऊ शकेल का ? नसेल, तर देशाच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
६. तथाकथित पुरो(अधो)गाम्यांचा दुटप्पीपणा !
भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाक खेळाडू महंमद रिझवान याने बाद झाल्यानंतर तो मैदानातून परततांना उपस्थित प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावरून आता वाद चालू झाला आहे.
६ अ. तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी याला विरोध करतांना म्हटले, ‘‘भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकारार्ह नाही. ती अत्यंत खालच्या दर्जाची आहे. खेळ दोन्ही देशांना संघटित करणारी शक्ती झाला पाहिजे. खर्या बंधूभावाला प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळाचा द्वेष पसरवणार्या शस्त्राप्रमाणे वापर करणे निंदनीय आहे.’’ ‘जय श्रीराम’च्या घोषणांना विरोध करणारे स्टॅलीन हे मात्र तेलंगाणा येथे पाकच्या विजयानंतर देण्यात आलेल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांच्या वेळी गप्प राहिले. त्यांनी याआधीही सनातन धर्माच्या विरोधात हीन दर्जाची टीका करून स्वतःतील हिंदुद्वेष वेळोवेळी प्रकट केला आहे.
६ आ. सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्याविषयी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट केले, ‘हे योग्य आहे का ? श्रीरामाचा उल्लेख सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असावा, शत्रूत्व नव्हे.’ माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन् यांनी याविषयी सरदेसाई यांना ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ‘ट्विटर’वरून) कठोर शब्दांत सुनावले.
७. पाकिस्तान क्रिकेट मंडळ भारतद्वेषीच !
पाकचा खेळाडू महंमद रिझवान याच्या समोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याविषयी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे तक्रार केली आहे; मात्र हेच मंडळ पाकिस्तानात भारत-पाक सामने खेळले जायचे, तेव्हा भारतीय खेळाडूंसमोर तेथील मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या, तेव्हा कुठे होते ? पाकच्या विजयानंतर भारतीय प्रेक्षकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या दिलेल्या घोषणा चालत असतील, तर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात काय चुकीचे ? पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा भारतीय प्रेक्षकांनी घोषणा देण्यावर आक्षेप असेल, तर ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देणार्यांवरही आक्षेप हवा.
८. भारतीय क्रिकेटप्रेमी आणि जागरूक हिंदू यांनी रिझवानवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत !
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांना, तसेच रिझवान याने शतक केल्यानंतर ते पॅलेस्टिनी नागरिकांना समर्पित करण्याच्या त्याच्या विधानाला ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी प्रत्युत्तर देणे कौतुकास्पद आहे; परंतु कितीही म्हटले, तरी खेळ हा खेळ आहे. भारतात क्रिकेटचे वेड असले, तरी खेळापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे. राष्ट्राचा विकास आणि सुरक्षा यांसाठी सर्व राष्ट्र अन् धर्म प्रेमी हिंदूंनी संघटित होऊन पाकिस्तानी खेळाडूंना विरोध केला पाहिजे, तसेच रिझवान याच्यावर कारवाई होण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’ यांच्यावर दबाव आणायला हवा.
९. भारतीय खेळाडूंनी विजिगीषू वृत्ती जोपासावी !
काही दिवसांपूर्वी झालेल्या पाकविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर भारताचा प्रसिद्ध खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तानचा खेळाडू तथा कर्णधार बाबर आझम याला स्वत:ची ‘जर्सी’ भेट दिली. स्पर्धेच्या काळात दोन्ही संघांचे खेळाडू मिळून-मिसळून रहातात. पाक खेळाडूंचे भारतीय खेळाडूंशी वर्तन चांगले नसले, तरी भारतीय खेळाडू त्याकडे दुर्लक्ष करून खेळतात. यामुळे पाक खेळाडूंकडून वारंवार भारतियांना डिवचले जाते. त्यांना स्थानिक धर्मांधांचाही पाठिंबा मिळतो. यामुळेच रिझवानसारख्या खेळाडूचे हमाससारख्या आतंकवादी संघटनेला उघड पाठिंबा देण्याचे धाडस होते. इस्रायला हा भारताचा मित्रदेश, तर पाकिस्तान हा शत्रू आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, यानुसार भारतीय खेळाडूंनी राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती अभिमान जागृत ठेवून इस्रायलला पाठिंबा द्यावा. रिझवानच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून त्याच्यावर कारवाई करण्यास ‘आयसीसी’ला भाग पाडावे; अन्यथा इस्रायलला पाठिंबा म्हणून पाकविरुद्धच्या सामन्यातील भारताचा विजय इस्रायलला समर्पित करून विजिगीषू वृत्ती जोपासावी.
१०. …तर सरकार हे करील का ?
एकंदरीत पहाता भारत-पाक सामना म्हटला की, जवळपास सर्वच जण त्याची आतुरतेने वाट पहात असतात, तसेच सामन्यानंतर पाकवरील विजयाचा आनंद साजरा करतात. सामाजिक संकेतस्थळांवर वेगवेगळ्या रील (छोट्या ध्वनीचित्रफिती), व्हिडिओ, ट्वीट करून पाकला ‘ट्रोल’ केले जाते. असे असले, तरी शत्रूराष्ट्र पाकमधील धर्मांध लोक आणि खेळाडू सामन्याकडे युद्ध म्हणूनच पहातात. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख झका अश्रफ यांनी भारताचा ‘शत्रूदेश’ असा उल्लेख केला होता. सध्या आतंकवाद, लव्ह जिहाद, घुसखोरी, खलिस्तानवाद यांचा भारताला मोठा धोका आहे. या सर्वांचा सूत्रधार पाकिस्तानच आहे. त्यामुळे विश्वचषकासारख्या मोठ्या मंचाचा वापर करून भारत-पाक क्रिकेट सामन्यांवर बंदी घालण्याची मागणी करून तसे करण्यास सरकारला भाग पाडावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकला उघडे पाडावे, हीच प्रखर राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१९.१०.२०२३)
(समाप्त)