गुरुकार्याची तळमळ असलेल्या आणि सर्व साधकांवर मातृवत् प्रेम करणार्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. प्रियांका चेतन राजहंस (वय ३७ वर्षे) !
आश्विन शुक्ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. अंजली अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
सौ. प्रियांका चेतन राजहंस यांना ३७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
सौ. अंजली अजय जोशी (सौ. प्रियांका यांची आई), सनातन आश्रम, मिरज (जिल्हा सांगली).
१. गुरुकार्याची तळमळ
‘काही दिवसांपूर्वी सौ. प्रियांका मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात दातांच्या उपचारांसाठी आली होती. तेव्हा ती एक मास येथे राहिली होती. त्या वेळी ‘मिरज आश्रमात सेवेच्या अंतर्गत अनेक गोष्टी प्रलंबित आहेत’, हे प्रियांकाच्या लक्षात आले. तेव्हा तिने पुढाकार घेऊन सेवा पहाणार्या साधकांना या गोष्टींची जाणीव करून दिली, तसेच त्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा केला. तिने संपूर्ण आश्रमात फिरून जेथे जेथे अनावश्यक साहित्य होते किंवा जेथे आश्रमाला अयोग्य दिसेल, अशी साहित्याची मांडणी केली होती, त्याची साधकांना जाणीव करून देऊन तेथे सुधारणा करून घेतली. त्याचप्रमाणे एका खोलीच्या बाजूला कपडे वाळत घालण्यासाठी बांबू लावला होता. त्यावर कपडे वाळत घातल्यावर ते मार्गावरून जाणार्यांना दिसायचे. हे तिच्या लक्षात आल्यावर तिने संबंधित साधकांना तेथे दोर्या नीट लावण्यास सांगितल्या.
यांतून ‘प्रत्येक आश्रम माझ्या गुरुदेवांचा आहे. तो व्यवस्थित दिसायला हवा आणि त्यातून सकारात्मक अन् चैतन्यमय स्पंदने यायला हवीत’, असा तिचा विचार असतो’, हे मला लक्षात आले.
२. प्रीती
२ अ. तिच्या बोलण्यात फार गोडवा आहे. त्यामुळे तिच्याशी सतत ‘बोलत रहावे’, असे वाटते.
२ आ. साधिकेला चुकांची कठोरपणे जाणीव करून देणे आणि लगेच तिच्या प्रकृतीची प्रेमाने चौकशीही करणे : ती मिरज आश्रमात असतांना भ्रमणभाषवरून रामनाथी आश्रमातील सेवाही करत होती. ती एका साधिकेचा आढावा घेत असतांना तिला तिच्या चुकांची कठोरपणे जाणीव करून देत होती; मात्र आढावा संपल्यावर क्षणभरातच त्या साधिकेला बरे नसल्याने तिने प्रेमाने साधिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि तिला ‘नामजपादी उपाय केलेस का ? औषध घेतलेस का ? जेवण जातंय ना ?’, असे प्रेमाने विचारले. हे पाहून तिच्यातील प्रेमभाव जाणवत होता.
२ इ. साधकांना तटस्थपणे चुका सांगणे : ती प्रत्येक साधकाची आई बनून काळजी घेते. आई आपल्या मुलाला चुकीची जाणीव करून देते, तसेच त्याच्यावर पुष्कळ प्रेमही करते. तशीच प्रियांका प्रत्येक साधकाला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य होण्याच्या दृष्टीने त्याच्या चुकांची कठोरपणे जाणीव करून देते आणि इतर वेळी त्यांच्याशी गोड स्वरात बोलते. तेव्हा तिच्यातील प्रत्येक साधकाप्रती आईप्रमाणे असलेली प्रीती जाणवते.
३. साधकांच्या प्रगतीची तळमळ असणे
‘मिरज आश्रमात साधकांमध्ये एकमेकांना चुका सांगून साहाय्य करण्याचा भाग अत्यल्प असतो. त्यामुळे साधकांचे एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य होत नाही’, हे तिने साधकांना लक्षात आणून दिले. ‘चुका सांगितल्या नाहीत, तर आपल्यामध्ये पालट होणार नाही. त्यामुळे गुरुकार्य आणि आपल्या साधकांची साधना यांची हानी होते’, हे तिने साधकांना लक्षात आणून दिले. त्यासाठी तिने रामनाथी आश्रमाचे उदाहरण दिले, ‘तेथे दिवसभरात पेटीमध्ये बरेच साधक सेवेतील चुका आणि सूत्रे लिहून ठेवतात. त्यामुळे सेवेतील त्रुटी सुधारण्याची संधी आम्हाला उपलब्ध होते.’ तिने साधकांना सांगितले, ‘‘एकमेकांच्या चुका सांगितल्याने त्या साधकांमध्ये सुधारणा होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते. गुरुदेवांनी गुरुकृपायोगात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला प्रथम स्थानी ठेवले आहे. त्यासाठी एकमेकांना साहाय्य करणे आवश्यक आहे. त्यातूनच तुमची प्रगती जलद गतीने होणार आहे.’’
‘परात्पर गुरु डॉक्टर, सौ. प्रियांका हिचे वरील गुण तुम्ही मला लक्षात आणून दिलेत, यासाठी कृतज्ञता व्यक्त करते आणि लवकरच सौ. प्रियांका संतपदी विराजमान व्हावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. अंजली अजय जोशी (सौ. प्रियांका यांची आई), सनातन आश्रम, मिरज (जिल्हा सांगली). (१२.१०.२०२३)